गुवाहाटी : आसाममधील गुवाहाटीमध्ये दिल्लीच्या श्रद्धा हत्याकांडासारखी घटना झाली आहे. यावेळी प्रियकराने प्रेयसीचे नव्हे तर पत्नीने पती आणि सासूची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून मेघालयातील डौकी येथे फेकण्यात आले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ पोलिस सूत्रानुसार, पत्नीने पती आणि सासूची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळले आणि ते मेघालयातील डौकी रोडवरील डोंगराळ भागात एका खोल खंदकात फेकून दिले. घटनेनंतर सात महिन्यांनी पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासात या निर्घृण हत्येचे खरे कारण समोर आले.
पत्नीचे अनैतिक संबंध होते : काही वर्षांपूर्वी गुवाहाटी येथील एसबीआय शाखेजवळील नारेंगी येथे राहणाऱ्या अमरज्योती डे यांचा विवाह वंदना कलिता नावाच्या तरुणीशी झाला होता. लग्नानंतर पती-पत्नीत सर्व काही ठीक होते. मात्र धनजीत डेका नावाच्या युवकाचे वंदनासोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. यावरून पती अमरज्योती आणि वंदना यांच्यात अनेकदा वाद होत होते. कौटुंबिक वादांमुळे वंदना आणि अमरज्योती यांच्यात घटस्फोटाची तयारी देखील सुरू होती.
म्हणून वंदनावर संशय आला : सात महिन्यांपूर्वी पती अमरज्योती आणि सासू बेपत्ता झाल्याची तक्रार वंदना यांनी नूनमती पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी एफआयआरच्या आधारे बेपत्ता व्यक्तींची तक्रार दाखल केली. तपास सुरू असताना, वंदनाने दुसरी तक्रार दाखल करत अमरज्योती डे यांच्या मामाने तिच्या सासूच्या पाच खात्यांमधून निधीचा अपहार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता वंदनानेच एटीएम वापरून एका खात्यातून ५ लाख रुपये काढल्याचे आढळले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना वंदनावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी वंदनाला फेब्रुवारीमध्ये अटक केली.
मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले : पोलिस चौकशीत वंदनाने पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांची हत्या केल्याची कबुली दिली. वंदनाने अरुप दास नावाच्या तरुणाच्या मदतीने सासू-सासऱ्याची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून तीन दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याची कबुली दिली. तीन दिवसांनंतर वंदनाने तिचा प्रियकर धनजित डेका याच्या मदतीने पती अमरज्योतीचा नरेंगी येथील राहत्या घरी निर्घृणपणे गळा आवळून खून केला. तिने अमरज्योती डे यांचेही तुकडे करून पॉलिथिनमध्ये टाकले. ते आई आणि मुलाचे मृतदेह धनजीत डेका यांच्या गाडीत भरून मेघालयातील डौकीला रवाना झाले. तिन्ही मारेकरी डौकी येथे आले आणि त्यांनी दोन मृतदेह रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात फेकून दिले.
हत्येत मोठ्या टोळीचा हात असल्याचा संशय : वंदनाने खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी शनिवारी तिनसुकिया येथून धनजीत डेका आणि खानापारा येथून अरुप दास यांना अटक करून गुवाहाटीच्या नुनमती पोलीस ठाण्यात आणले. या नंतर नूनमती पोलिसांचे पथक रविवारी पहाटे तिन्ही मारेकऱ्यांना घेऊन मेघालयातील डौकी येथे दाखल झाले. पोलिसांनी खोल खंदकातून मृतदेहाचे अनेक भाग बाहेर काढले. या हत्येत मोठ्या टोळीचा हात असल्याचा संशयही पोलिसांना आहे. घटस्फोट आणि मालमत्तेवरून ही हत्या झाल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. अधिक माहितीसाठी पोलीस तिन्ही आरोपींची कसुन चौकशी करत आहेत.
हेही वाचा : Karnataka Crime News : आयफोनसाठी केली डिलिव्हरी बॉयची हत्या, बाथरूममध्ये लपवून ठेवला मृतदेह!