नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या गदारोळात पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी खासदार शशी थरूर यांची भेट घेतली आहे. दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी (29 सप्टेंबर)रोजी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला असून ते उद्या शुक्रवार (दि. 29 सप्टेंबर)रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Congress president Election) दिग्विजय सिंह यांनी शशी थरूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, शशी थरूर यांनी ट्विट केले की, "दिग्विजय सिंह भेटायला आले होते. मी त्यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या उमेदवारीचे स्वागत करतो. आमची लढत प्रतिस्पर्ध्यांमध्ये नाही तर मित्रांमध्ये आहे.
खासदार शशी थरूर हेही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. ते शुक्रवारी (३० सप्टेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी सर्वप्रथम निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचेही नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.
राजस्थान काँग्रेसमधील कलहानंतर अशोक गेहलोत यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आज त्यांनी दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्यास नकार दिला. बैठकीनंतर ते म्हणाले, 'मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. तसेच, झाल्या प्रकाराबद्दल मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे.' काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.