नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Meet PM Modi ) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली असून या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भेटीसंदर्भातील माहिती दिली. 'लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. देखील उपस्थित होते. यावेळी लक्षद्वीपच्या विविध मुद्यांवर चर्चा झाली' असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच या भेटीदरम्यान, विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) विचार करून योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. संजय राऊतांवरील कारवाई ( Sanjay Raut ED Enquiry ) करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
काय म्हणाले शरद पवार? - प्रफुल्ल के पटेल यांना दादरा नगर हवेली आणि दमण दीवचा कार्यभार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना लक्षद्वीपचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांच्या नियुक्तीनंतर लक्षद्वीपला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ महिन्यांपासून तेथे भूसंपादनाचा मुद्दा गाजत आहे. तेथील बहुतेक लोक नोकऱ्यांवर अवलंबून आहेत. मात्र, पटेल यांनी 2400 कर्मचारी-अॅडहॉक तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे, त्यामुळे या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच यावेळी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या प्रश्नावर चर्चा झाली असून नरेंद्र मोदी विचार करून योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला असून या कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवारांनी उपस्थित केला. तसेच भाजपाशी आमचा काहीही संबंध नसून राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र भाजपशी लढणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शरद पवार यांनी युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. युपीएच्या अध्यक्षपदाजी जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार नसल्याचे ते म्हणाले. मात्र, भविष्यातील कृतीबद्दल चर्चा करण्यासाठी बिगर-भाजप समविचारी पक्षांची बैठक बोलावली पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एका समान व्यासपीठावर यावे आणि महागाई, विशेषत: इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि इतर समस्यांसारखे मुद्दे कसे मांडता येतील यावर चर्चा करावी, असे ते म्हणाले.
हेही वाचा - 'ही' आहेत लक्षद्वीपच्या नागरिकांमधील असंतोषाची कारणे, वाचा...