रांची : झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राजधानीतील हरमू मैदान येथे हा मेळावा घेण्यात आला. संघटना बळकट करण्यासाठी झारखंडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महेंद्रसिंह धोनीवर वाहिली स्तुतीसुमने..
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, की याठिकाणी येणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. क्रिकेटला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याचे श्रेय त्यांनी महेंद्रसिंह धोनीला दिले. ते म्हणाले, की राहुल द्रविडनंतर मी सचिन तेंडुलकरला कप्तानपद घेण्याबाबत सुचवले होते. मात्र, त्याने धोनीचे नाव पुढे केले. धोनी ज्या ठिकाणी जन्मला त्या भूमीमध्ये आल्यामुळे मला आनंद होतो आहे.
भाजपावर साधला निशाणा..
पवार पुढे म्हणाले, की भाजपा सत्तेत आल्यापासून देशात जातीय हिंसाचार वाढला आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, आणि पंतप्रधान मोदी परदेश दौरे आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यामध्ये व्यग्र आहेत. आपल्या घरापासून २० किलोमीटर दूर असणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मात्र त्यांना वेळ नाही.
पश्चिम बंगालमध्ये ममतांना पाठिंबा देण्याचा विचार..
पवार म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून केंद्र सरकार वेगवेगळे डावपेच वापरत आहे. भाजपा सध्या केवळ ओवैसींमुळे जिंकत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना पाठिंबा देण्याचा आपण विचार करत असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला पक्षाचे विविध नेते उपस्थित होते. यानंतर पवार राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही भेट घेतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, की राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आपली ओळख टिकवून ठेवेल. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून काम करायला हवे.
हेही वाचा : ममतांच्या 'स्कूटी'ने नंदीग्राममध्येच पडायचं ठरवलंय, तर त्याला आम्ही काय करणार? - पंतप्रधान मोदी