नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव सादर करताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या एपीएमसी मार्केटसंदर्भातलं एक वक्तव्यं वाचून त्यांच्यावर टीका केली. तसेच आम्ही हे कायदे मागितले नव्हते. तर का आणले, अशी तक्रार करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणांचं समर्थन शरद पवार यांनी केलं होतं. याचा पुन्हा एकदा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यसभेत बोलतानाही नरेंद्र मोदींनी कृषी सुधारणांवर शरद पवार यांनी यू टर्न घेतला असल्याचं म्हटलं होतं. मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी सुधारणांच समर्थन केलं होतं. आता ते याच्या उलट बोलत आहेत, असेही मोदी आज म्हणाले.
कायदे हे प्रगतशील समाजासाठी आवश्यक -
बऱ्याच जणांची तक्रार आहे की आम्ही हे कायदे मागितले नव्हते. हे कायदे का आणले? पण कुणी हुंडाबंदीविरोधी कायदा मागितला नव्हता. मात्र, तो प्रगतशील समाजासाठी आवश्यक होता, असे मोदी म्हणाले. तसेच शिक्षण, मुलींना संपत्तीत अधिकार, ट्रिपल तलाकविरोधी कायदा कुणी मागितले नव्हते. मात्र, ते आणण्यात आले. कारण हे सगळे कायदे हे प्रगतशील समाजासाठी आवश्यक आहेत, असे मोदी म्हणाले.
विन्स्टन चर्चिल संबंधित उदाहरण -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना सिगारेट पाठवण्याची जबाबदारी असणाऱ्या एका व्यक्तीचे उदाहरण दिले. स्थिती जैसे थे ठेवण्याची पद्धत किती चुकीची आहे हे सांगण्यासाठी, त्यांनी चर्चिलच उदाहरण दिलं. शेतमालाची जुनी व्यवस्था संपलेली नाही. ज्यांना नवी व्यवस्था आवडली नाही. ते जुनी व्यवस्था पावरू शकता. साचलेलं पाणी रोगराई आणतं. वाहणारं पाणी आयुष्य फुलवतं, असे ते म्हणाले.