नवी दिल्ली - मार्च २०२४पासून हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) 'तेजस' या हलक्या लढाऊ विमानाचा पुरवठा भारतीय हवाई दलाला करणार आहे. एचएएल एकूण ८३ विमाने हवाई दलाला देणार असून पहिल्या टप्प्यात १६ विमान दिली जाणार आहेत. भारतीय हवाई दलाशिवाय इतरही अनेक राष्ट्रांनी भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान खरेदी करण्यात रस दाखवला आहे, अशी माहिती एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर माधवन यांनी दिली.
'तेजस' चीनपेक्षा सरस -
तेजसची निर्मीती झाल्यापासून अनेक देशांच्या हवाई दलांनी त्याच्या खरेदीमध्ये रस दाखवला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये नक्कीच 'एचएएल'ला निर्यातीची संधी मिळेल. 'तेजस मार्क १ए' हे लढाऊ विमान चीनच्या 'जेएफ-१७'च्या तुलनेत उत्कृष्ट आहे. तेजसचे इंजिन, सुकाणू(रडार) यंत्रणा, यांत्रिक युद्ध प्रणाली आधुनिक आणि जलद आहे. विशेष म्हणजे तेजस आकाशातच दुसऱया लढाऊ विमानामध्ये इंधन भरू शकते, अशी माहिती एका मुलाखतीमध्ये माधवन यांनी दिली.
केंद्रीय मंत्रीमंडळाने दिली खरेदीला मंजूरी -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने ८३ नव्या तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचा हा करार असणार आहे. एका लढाऊ तेजसची किंमत ३०९ कोटी रुपये असून प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱया तेजसची किंमत २८० कोटी रुपये आहे. भारतीय हवाई दलासाठी केलेल्या तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचा करारातील २५ हजार कोटी रुपये विमानांच्या प्राथमिक रचनेसाठी लागणार आहे, अशी माहिती माधवन यांनी दिली.
संपूर्ण भारतीय बनावटीचे 'तेजस'..
'लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) मार्क १ ए' (तेजस) हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. याच्या निर्मितीमुळे देशातील लढाऊ विमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. देशातच डिझाईन आणि विकसित केलेले हे पहिलेच लढाऊ विमान आहे. यामध्ये अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अॅरे (एईएसए) रडार, बियाँड व्हिजुअल रेंज (बीव्हीआर) मिसाईल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (ईडब्ल्यू) सूट आणि एअर टू एअर रिफ्यूलींग (एएआर) अशा सुविधा असणार आहेत.