मुरादाबाद : शेतात वडिलांसाठी चहा घेऊन जाणाऱ्या ७ वर्षीय मुलावर रविवारी सकाळी कुत्र्यांनी हल्ला केला. यामुळे हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याचा आरडाओरडा ऐकून लोकांनी कुत्र्यांचा पाठलाग केला. यानंतर जखमी मुलाला डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र दवाखान्यात आलेल्या डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. मुरादाबादमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारांच्या जवळपास असल्याचे सांगण्यात येत आहे. ही एक प्रकारे लोकांची डोकेदुखी झालेली आहे. कुत्री पिसाळून चावल्यावर त्याचाही मोठा त्रास लोकांना होत असतो.
मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील रुस्तमपूर खास गावात सात वर्षांचा सवेंद्र रविवारी सकाळी आपल्या मोठ्या बहिणीसोबत आई-वडिलांकडे चहा घेऊन जात होता. वाटेत भटक्या कुत्र्यांच्या टोळीने या निष्पाप बालकावर हल्ला केला. आपल्या भावाला कुत्र्यांनी वेढलेले पाहून मोठी बहिण आरडा ओरडा करुन मोठ्याने आवाज करू लागली. त्यांचा आवाज ऐकून लाठ्या-काठ्या घेऊन ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांपासून निष्पाप बालकाची सुटका केली. यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी गंभीर जखमी सवेंद्रला सीएचसी बिलारी येथे नेले. मात्र दवाखान्यात येण्यापूर्वीच त्याचा जीव गेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सवेंद्र हा इयत्ता 2 चा विद्यार्थी होता.
भटक्या कुत्र्यांचा मुरादाबादमध्ये वावर वाढत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मुरादाबाद जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल ५० हजारांच्या जवळपास आहे. त्यांच्या दहशतीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. कुत्र्यांचा जमाव रस्त्यावर सतत तळ ठोकून असतो. यापूर्वीही अनेक मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. याशिवाय ते म्हशी, बकऱ्यांचाही चावा घेत असतात. या कुत्र्यांना पकडण्यासाठी अनेकवेळा प्रशासनाला विनंती करूनही लोकांचे कुणीही ऐकत नाही. तसेच त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे दिसून आले आहे.
महाराष्ट्रातही अशा प्रकारे काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी विविध पालिका आपापल्या परिने उपाययोजना करत असतात. मात्र त्याला पुरेसे यश येताना दिसत नाही असेच अशा घटनांच्यावरुन दिसून येते.