हैदराबाद - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपीनीने कोव्हिशिल्ड ही कोरोनावरील लस तयार केली आहे. आता भारतात या लसीचा पुरवठाही सुरू झाला आहे. आज १३ शहरात ही लस विमानाने दाखल होणार आहे. भल्या पहाटे लसींनी भरलेले कंटेनर विमानतळावर रवाना झाले आहेत. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे.
लस निर्मितीमध्ये पुण्यातील सीरम कंपनी जगभरात आघाडीवर आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सीरम कंपनीने लस निर्मितीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका फार्मा कंपनीसोबत सहकार्य केले. त्यानुसार लसीवर संयुक्तपणे संशोधन करण्यात आले. सोबतच सीरम कंपनीत मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन सीरमच्या फॅसिलिटीतच करण्यात येत आहे. कंपनीने लसीला परवाना मिळण्यासाधीच कोट्यवधी डोस तयार करून ठेवले होते. ही लस शीतगृहात ठेवाली लागते. त्यामुळे त्यासाठी खर्च येतो. आता लसीचा पुरवठा करताना कोल्ड स्टोरेजमधूनच लस देशातील विविध शहरात पोहचवण्यात येत आहे. सुरुवातील प्राधान्य गटातील कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे. डॉक्टर, नर्स आरोग्य कर्मचारी यांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येणार आहे.
कोरोना लस निर्मिती
ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोविड १९ ही लस प्रोफेसर सारा गिल्बर्ट, अॅन्ड्र्यू पोलार्ड, तेरेसा लामबे, डॉ. सँडी डगलसस, कॅथरिन ग्रीन आणि अॅड्रीन हिल यांच्या नेतृत्वाखाली झाली. या पथकात ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश आहे, ज्यांनी २०१४ साली इबोला संसर्गावर लस निर्मितीत सहभाग घेतला होता.
कोविशिल्ड ही लस पुण्यातील सीरम कंपनीत उत्पादित केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीचे सहकार्यही घेण्यात येत आहे. इंग्लडमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि इंग्लमध्ये घेण्यात आली असून आता तेथेही लसीकरण सुरू आहे.
सीरम लसीच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून लस कार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर भारत सरकारने आणीबाणीच्या काळात वापरासाठी लसीला परवाना दिला. या सोबतच भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीलाही आणीबाणीच्या वापरासाठी परवाना दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त असून कोरोना टास्क फोर्सने याबाबत निर्णय घेतला.
लस तयार होण्याची प्रक्रिया काय ?
कुठलीही लस निर्मितीसाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र कोरोनावरील लसीसाठी हे काम वेगाने सुरू आहे. तसेच चीनने कोरोनाचा जनुकीय अभ्यास जानेवारीतच सुरू केला होता, जेव्हा केवळ चीनमध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव होता.
एखादी लस तयार करण्यासाठी प्राथमिक चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांत लस यशस्वी ठरल्यास क्लिनिकल ट्रायल घेण्यास परवानगी मिळते. पहिल्या टप्यात कमी जणांवर लसीची चाचणी केली जाते. दुसऱ्या टप्प्यात लसीचे वैद्यकीय परीक्षण केले जाते. पुढे ही लस त्या लोकांना दिली जाते ज्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम आणि वय कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात लस हजारो लोकांना दिली जाते आणि त्यावरुन लसीची परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे परीक्षण केले जाते. लसीसाठी मंजुरी आणि परवाना मिळण्याचा चौथा टप्पा असतो. सिरम कंपनीने हे चारही टप्पे पार केले असून आणीबाणीच्या काळात वापरासाठी तिला परवानगी मिळाली आहे.