पुणे - सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला खासगी विमानाने भारतात परतले आहेत. कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून धमक्या मिळत असल्याने ते लंडनला गेल्याची चर्चा होती. यानंतर सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर केले होते. आता अदर पूनावाला पुण्यात दाखल झाले आहेत. पूनावाला यांनी लंडनच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला होता. त्यांना मोठ्या लोकांकडून धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
अदर पूनावाला काही काळापूर्वी भारतात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान ब्रिटनला गेले होते. यावर बरीच चर्चा झाली होती. मात्र, आता ते पुण्यात परतले आहेत. पूनावाला समूहाचे खासगी जेट पुणे विमानतळावर दाखल झाले होते.तेथून अदार पूनावाला थेट एका खासगी हेलिकॉप्टरमधून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे रवाना झाले.
काय प्रकरण?
अदर पूनावाला यांनी लसीच्या उत्पादन आणि पुरवठ्यावरून काही जणांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. कोरोना काळात देशासाठी भरीव योगदान देणाऱ्या पूनावाला यांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकाराला सुनावणीदरम्यान म्हटलं होते. त्यावर सीरम इंस्टिट्युटचे अदर पूनावाला यांना 'Y' दर्जाची सुरक्षा, याशिवाय केंद्र सरकारतर्फे सीआरपीएफचे जवानही त्यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच कारवाईचा अहवाल 10 जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.