नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढ्यात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भारत सरकारने सीरम कंपनीने तयार केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोना विरोधातील लसीला परवानगी दिली आहे. या दोन्ही कंपन्या भारतीय असून स्वदेशी लस आता सर्वांना लवकरच मिळणार आहे. लसीला परवानगी मिळाल्यानंतर सीरम कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.
अदर पुनावाला यांचे ट्विट -
नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोरोना लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून सीरम कंपनीने धोका पत्करला होता. मात्र, आता आमच्या कष्टाचं चीज झालं. भारताची पहिली लस कोविशिल्डला परवानगी मिळाली आहे. ही लस सुरक्षित, परिणामकारक असून येत्या काही आठवड्यांत बाजारात येणार आहे, असे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.
भारताचे औषध महानियंत्रक डॉ. वेणूगोपाल सोमानी यांनी नॅशनल मेडिकल सेंटर येथे पत्रकार परिषद घेत लसींना परवानगी दिल्याची माहिती दिली. कोरोना लसीबाबत निर्णय घेण्यासाठी भारत सरकारने सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या अंतर्गत विषय तज्ज्ञ समितीची (SEC) स्थापना केली होती. या समितीने दोन लसींची शिफारस डीसीजीआय कार्यालयाकडे केली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनी आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीला भारतात परवानगी मिळाली आहे.
पंतप्रधान मोदींनी केले ट्विट
डीसीजीयने कोरोना लसींना परवानगी दिल्यानंतर लगेच पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. तातडीच्या वापरासाठी ज्या दोन लसींना परवानगी दिली आहे, या दोन्ही लसी भारतीय बनावटीच्या आहेत, याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटेल. आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाचा आपल्या वैज्ञानिकांचा उत्साह यातून दिसून येतो. जनतेच्या आरोग्याच्या काळजीमुळे हे शक्य झाल्याचे मोदी म्हणाले. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी या कोरोना योद्धांनी केलेल्या अप्रतिम कामाबद्दल आपण त्यांचे आभार मानू. कठीण परिस्थिती काम करून त्यांनी लोकांचे जीव वाचवल्याबद्दल त्यांचे आपण सर्व आभारी आहोत, असे मोदी म्हणाले.