श्रीनगर - पिपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे वरिष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री मुजफ्फर हुसेन बेग यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये (एनसी) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, या फॉर्म्युल्यावर बेग नाराज होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
नॅशनल कॉन्फरन्स जास्त जागा लढवण्याच्या तयारीत
'ज्या पद्धतीने पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षात जागा वाटप झाल्या. त्यामुळे मी नाराज झालो. ठरलेल्या जागा वाटपानुसार एनसी पक्ष जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही गोष्ट पीडीपी पक्षाच्या फायद्याची नाही. त्यामुळे राजीनामा द्यायचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्याशीही पक्ष सोडण्याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
गुपकर अलायन्सनंतर काश्मीरातील राजकारण बदलले
बेग हे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे जुने सहकारी होते. मात्र, मागील काही दिवसांपासून मुफ्ती या इतर पक्षातील नेत्यांच्या जास्त संपर्कात आल्याने बेग नाराज असल्याचे समोर आले आहे. जम्मू काश्मीरची स्वायत्तता माघारी मिळविण्यासाठी काश्मीरातील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुपकर अलायन्स या संघटनेची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत पीडीपी आणि एनसी पक्ष मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवत आहेत. मात्र, आता पक्षाच्या नेत्यांमधील धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. काश्मीरची स्वायत्तता माघारी घेण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले असून त्यांनी रणनीती ठरवली आहे. केंद्र सरकार विरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.