डेहराडून - उत्तराखंड सरकारने शुक्रवारी सर्व राज्य सरकारांना 'हरिद्वार कुंभमेळ्यात' भाग घेणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. राज्याचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात कुंभमेळ्यासाठी कोणतीही विशेष बस चालवू नये अशी विनंती केली.
केंद्र सरकारने उत्तराखंड सरकारला 'हरिद्वार कुंभमेळ्यासाठी' येणाऱ्या भाविकांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इतर कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला नोंदणी आणि वैद्यकीय अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या मार्गदर्शन सूचनांचे स्वागत संत आणि स्थानिक लोकांनी केले आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या एसओपीमध्ये राज्य सरकार कोणतीही दुरुस्ती करू शकत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारला कुंभमेळ्याची व्यवस्था पूर्ण करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आता भक्तांना नोंदणीसह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. उत्तराखंड सरकारने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि 10 वर्षाखालील मुलांना कुंभ मेळाव्यात सहभागी होण्याची परवानगी दिलेली नाही.
कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट -
'कुंभमेळा' 15 जानेवारीपासून हरिद्वारमध्ये सुरू असून तो 27 एप्रिल रोजी संपणार आहे. अलाहबाद म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. दर तीन वर्षांनी एका ठिकाणी, अशा प्रकारे बार वर्षांत या चारही ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असे नाही तर जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र, यंदा त्यावर कोरोनाचे सावट पडलं आहे.