नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवार) शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या २० व्या बैठकीत व्हर्च्युअली सहभाग घेतला. यावेळी बोलताना मोदींनी जागतिक स्तरावर बहुपक्षीय विकासाची अपेक्षा व्यक्त केली. जगासमोरील आव्हाने, समस्या आणि मानवी विकास या मुद्द्यांवर चर्चा गरजेची असल्याचे मोदी म्हणाले. तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेत अमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे ध्येय सफल झाले नाही
शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायेझेशनची २० वी बैठक आज पार पडली. संयुक्त राष्ट्राची स्थापना होऊन ७५ वर्ष झाली तरी संघटनेचे उद्दिष्ट सफल झाले नसल्याचे मोदी यावेळी म्हणाले. अनेक बाबींमध्ये संयुक्त राष्ट्र यशस्वी ठरले आहे. मात्र, संघटनेचा मूळ हेतू सफल झाला नाही. जग आर्थिक आणि सामाजिक आघाड्यांवर अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेत अमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.
२०१७ साली भारताचा संघटनेत समावेश
यावेळी एससीओ बैठकीचे अध्यक्षपद रशियाकडे आहे. शी जिंगपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन यांनी बैठकीला हजेरी लावली. कझाकिस्तान, किर्गीजस्तान, तझाकिस्तान, उझबेकिस्तान देशांच्या प्रमुखांनीही बैठकीत सहभाग घेतला होता. भारताने तिसऱ्यांदा या बैठकीत सहभाग घेतला आहे. २०१७ साली भारताचा या संघटनेत सहभाग झाला आहे.