इंदूर : मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उशा ठाकूर यांनी रविवारी गोमातेचे कौतुक करण्याचा आणखी एक टप्पा पार केला. कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी घरामध्ये शेणाच्या गोवऱ्यांचा यज्ञ करण्याचा सल्ला त्यांनी दिला. असे केल्यास घर १२ तासांपर्यंत निर्जंतुक राहते असा दावा त्यांनी यावेळी केला. इंदूर पत्रकारसंघातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईमध्ये अॅलोपॅथीसोबतच वेदिक संस्कृतीचाही मोठा वाटा आहे. ही महामारी म्हणजे आपल्याला वेदिक संस्कृतीकडे परतण्याचा इशारा असल्याचेही ठाकूर यावेळी म्हणाल्या.
असा करायचा यज्ञ..
हा यज्ञ करण्याठीचा विधीही त्यांनी यावेळी सांगितला. गाईच्या दुधापासून बनलेले तूप, आणि भाताचे मिश्रण शेणाच्या गोवऱ्यांवर लावायचे. त्यानंतर सकाळी आणि सायंकाळी त्या गोवऱ्या घरामध्ये पेटवायच्या. असे केल्याने तुमचे घर निर्जंतुक राहील, असे ठाकूर म्हणाल्या. हे काहीतरी थोतांड आहे असे अनेकांना वाटेल, मात्र हे विज्ञान आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन