नवी दिल्ली/नोएडा SC Lawyer Murder : सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रेणू सिन्हा यांची ४.५ कोटी रुपयांच्या संपत्तीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. नोएडा पोलिसांनी या हत्येचा खुलासा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. सध्या या प्रकरणातील इतर बाबी लक्षात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.
मालमत्तेच्या वादातून हत्या केली : सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रेणू सिन्हा यांची रविवारी संशयास्पद स्थितीत हत्या करण्यात आली होती. नोएडातील सेक्टर ३० येथील डी ४० फ्लॅटच्या बाथरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांची ४.५ कोटी रुपयांची मालमत्ता या हत्येमागील कारण असल्याचं सांगितलं जात होतं. रेणू सिन्हा यांचा पती अजयनाथ याला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चौकशीदरम्यान हेही समोर आले की, रेणू सिन्हा यांच्या पतीला ही मालमत्ता विकायची होती. मात्र त्या याला विरोध करत होत्या.
पती निवृत्त आयआरएस अधिकारी आहे : रेणू सिन्हा यांचे पती निवृत्त आयआरएस अधिकारी आहेत. या घटनेनंतर त्यांच्या भावानं आपल्या मेहुण्याविरुद्ध खुनाचा संशय घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांची अनेक पथकं या घटनेचा तपास करत होती. आरोपी पतीला पकडण्यासाठी त्याचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ट्रॅक करण्यात आलं. त्यानंतर शेवटच्या लोकेशनच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.
हत्येत आणखी कोणाचा हात असल्याचा संशय : रेणू सिन्हा यांच्या हत्येनंतर घराचं गेट बाहेरून बंद करण्यात आलं. त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये होता. तर आरोपी पती घरातील स्टोअर रूममध्ये लपून बसला होता. घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावलं असल्यामुळं या घटनेत आणखी कोणीतरी सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर बाबी लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
श्वानपथकाला आरोपी सापडला नाही : घटनेनंतर बेपत्ता झालेल्या आरोपी पतीनं स्वत:ला एका छोट्या स्टोअर रूममध्ये कोंडून घेतलं होतं. दरम्यान, पोलिसांसह फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकानं घटनास्थळी बराच तपास केला, मात्र ते आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाही. पोलिसांनी श्वानपथकावर लाखो रुपये खर्च करूनही या खूनाचा उलगडा करण्यात श्वानपथक पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. विशेष म्हणजे, आरोपीनं स्वत:ला स्टोअर रूममध्ये चक्क १० तास कोंडून ठेवलं होतं.
हेही वाचा :