बेळगाव : कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने सोमवारी बेळगावच्या सुवर्ण विधान सौधा सभागृहात (Karnataka assembly) वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. (savarkar portrait unveiled in Karnataka assembly). काँग्रेसने मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. (Karnataka assembly congress protest). विधानसभेच्या सभागृहात लावण्यात आलेल्या सात स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांमध्ये सावरकरांच्या चित्राचाही समावेश आहे. काँग्रेस नेते आणि आमदारांच्या अनुपस्थितीत हा सोहळा पार पडला.
स्वातंत्र्य लढा केवळ नेहरूंनी लढवला नाही : यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, कायदा मंत्री जे. मधुस्वामी आणि जलसंपदा मंत्री गोविंद करजोल आदी उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनावरण सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विधानसभेचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. काँग्रेसच्या विरोधावर आक्षेप घेत भाजपचे आमदार एन. रविकुमार म्हणाले, "स्वातंत्र्य लढा केवळ काँग्रेस नेते आणि नेहरूंनी लढवला नाही. वीर सावरकरांनी देशातील क्रांतिकारकांच्या संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. विधानसभा, संसद आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांचे चित्र लावले नाही तर ते कुठे लावणार?"
टिपूचे चित्र कुठेही लावू देणार नाही : वीर सावरकरांचे चित्र लावल्यास म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांचे चित्र विधानसभेत लावले जाईल या काँग्रेसच्या विधानावर रविकुमार म्हणाले, "टिपू सुलतान हा धर्मांध होता. मंदिरे नष्ट करणारा होता. त्याने कन्नडच्या जागी फारसी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केला". ते पुढे म्हणाले, "विधानसभा सोडा, आम्ही टिपूचे चित्र कुठेही लावू देणार नाही". भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यत्नल म्हणाले की, इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचे टपाल तिकीट काढले होते, याचा काँग्रेस नेत्यांना विसर पडला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या सावरकर आणि कर्नाटकचा कोणताही संबंध नाही आहे, या व्यक्तव्यावरून भाजपचे आमदार के.एस. ईश्वरप्पा यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि कर्नाटक यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईश्वरप्पा म्हणाले, शिवकुमार यांना फक्त तिहार जेल आणि बंगळुरू सेंट्रल जेलची माहिती आहे. त्यांनी सेल्युलर जेल आणि अंदमानमध्ये स्वातंत्र्यसैनिकांना दिलेल्या क्रूर शिक्षेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था : महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावरून विविध समुदायांनी केलेल्या निदर्शनांमुळे संपूर्ण शहराचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. सुवर्ण विधानसौधमध्येही विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. सभागृहाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि अनेक बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांमध्ये सहा पोलिस अधीक्षक, 11 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 43 उपअधीक्षक, 95 निरीक्षक आणि 241 उपनिरीक्षकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती (MMES) बेळगावचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या व्हॅक्सिन डेपोच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
धैर्यशील माने यांना प्रवेशबंदी : महाराष्ट्रातील हातकणंगले मतदारसंघातील लोकसभा सदस्य धैर्यशील माने यांनी त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. मात्र, त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असे सांगत अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती फेटाळली. एमईएस व्यतिरिक्त बेळगावमध्ये अनेक शेतकरी संघटना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.
विधानसभा निवडणुका तोंडावर : निवडणुकीला जेमतेम चार महिने उरले असल्याने हे अधिवेशन विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असेल, असे सूत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांकडून विविध खात्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार, मतदारांच्या माहितीच्या चोरीशी संबंधित घोटाळे, सीमावाद आणि सरकारने तो कसा हाताळला, जातीय हिंसाचाराच्या घटनांसह कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, मंगळुरूमधील कुकर स्फोट आणि शेतकऱ्यांच्या मागण्या या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणुका तोंडावर आल्याने, विरोधी पक्ष 2018 च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे आणि अनेक शहरी भागात, विशेषत: बेंगळुरूमधील पायाभूत सुविधांच्या समस्यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की वादग्रस्त हलाल विरोधी विधेयक देखील या अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) एका आमदाराकडून मांडले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.