जबलपूर : भाजपा नेत्या सना खान यांच्या मृतदेहाचा शोध जबलपूरमध्ये घेतला जात आहे. सना खानचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह हिरण नदीत टाकल्याची कबुली मारेकरी अमित साहूने दिली होती. त्यानंतर नागपूर आणि जबलपूर पोलिसांचे पथक गेल्या आठवड्यापासून हिरण नदीत मृतदेहाचा शोध घेत आहे. परंतु पोलिसांना तिचा मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांनी नदीत मृतदेह शोधणे बंद केले आहे. यामुळे सना खान यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम राहिले आहे. शिवाय अमित साहूला मारेकरी सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
हिरण नदीत मृतदेह फेकल्याची कबुली : 2 ऑगस्ट रोजी भाजपानेत्या सना खान जबलपूरमध्ये त्यांचा मित्र अमित उर्फ पप्पू साहूला भेटायला गेल्या होत्या. सना खान अमितच्याच घरी राहत होत्या. सना खान आणि अमित साहू यांचे भांडण झाले. त्यानंतर अमित साहूने त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. आरोपी अमित साहूने याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर नागपूर आणि जबलपूर पोलिसांचे पथक नदीत मृतदेहाचा शोध घेऊ लागले. पोलिसांनी नदीत 6 किलोमीटरपर्यंत मृतदेहाचा शोध घेतला तरीही त्यांच्या हाताला यश आले नाही.
कोणाचा सापडला मृतदेह : शिवनी येथे एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला होता. मात्र तो सना खान यांचा नसल्याचे तपासात आढळून आले. तसेच जबलपूरपासून 350 किलोमीटर दूर असलेल्या हरदा येथे आणखीन एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सना खानच्या कुटुंबियांना बोलवले. परंतु तो मृतदेह सना खानचा नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. दरम्यान सना खानच्या कुटुंबियांच्या आरोपावरुन पोलिसांनी आरोपी अमित उर्फ पप्पू साहूला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्याने सना खानचा खून केल्याचे कबूलही केले आहे. मात्र जोपर्यंत पोलिसांना पुरेसे पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत त्याच्यावर हत्येचा गुन्हा सिद्ध करणे कठीण आहे.
नागपूरहून आली फॉरेन्सिक टीम : अमित साहूच्या जबाबाशिवाय पोलिसांकडे हत्येप्रकरणी दुसरा कोणताच भक्कम पुरावा नाही. तसेच पोलिसांना सना खानचा मृतदेह अजून सापडलेला नाही. अशात जर अमितने न्यायालयात जबाब बदलला तर त्याची सुटका होऊ शकते. यामुळे सना खानचा मृतदेह शोधणे पोलिसांची प्राथमिकता होती. परंतु नदीत मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. पोलिसांच्या मते, अमितने सना खानचा मृतदेह हिरण नदीत फेकला असेल, परंतु तो पुरात वाहून गेला असेल. यामुळे अमितला मारेकरी सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान नागपूर पोलिसांची फॉरेन्सिक टीम जबलपूरला गेली आहे. जबलपूरमधील राजुल टाऊनशिप येथील अमित साहूच्या घरात पुरावे शोधत आहेत. तसेच सना खानचा मृतदेह नेण्यासाठी अमित साहूने ज्या कारचा उपयोग केला होता, त्या कारचीही तपासणी केली जात आहे.
हेही वाचा-