जमुई Same Sex Marriage : बिहारमध्ये समलिंगी विवाहाचं एक प्रकरण समोर आलंय. दोन मुलींनी मंदिरात जाऊन एकमेकांशी लग्न केलंय. यानंतर या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. बिहारच्या जमुई आणि लखीसराय इथून ही बाब समोर आलीय. यातील एक मुलगी जमुईच्या लक्ष्मीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दिघी गावची रहिवासी असून दुसरी लखीसराय जिल्ह्यातील हलसी पोलीस स्टेशन हद्दीतील गेरुवा पुरसुंदा येथील रहिवासी आहे.
24 ऑक्टोबरला झालं दोघींचं लग्न : या दोघींची ओळख एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात झाली. यानंतर दोघींची मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 24 ऑक्टोबर रोजी दोघींनी जमुई इथं एका मंदिरात जाऊन एकमेकांशी लग्न केलं. या दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय. यामुळं आजूबाजूचे लोक मात्र आश्चर्यचकित झाले आहेत.
दीड वर्षांपासून एकमेकींवर करतात प्रेम : यातील जमुई येथील मुलगी पतीची भूमिका साकारणार असून लखीसराय येथील मुलगी पत्नीची भूमिका साकारणार आहे. लखीसरायच्या मुलीच्या मामांचं दीड वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. या लग्नसोहळ्यात या दोघींची भेट झाली. त्यानंतर दोघीही एकमेकींच्या जवळ आल्या आणि मोबाईलवरून वारंवार बोलू लागल्या.
कौटुंबीक विरोधामुळे पाटण्याला गेल्या पळून : दोघींनी आपल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. यामुळं दोन्ही मुली घरातून पळून गेल्या आणि काही दिवस पाटण्यात राहू लागल्या. त्यानंतर दिघी येथील मुलीच्या वडिलांनी लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात अर्ज करून आपल्या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही दोघींनीही समलिंगी विवाह केलाय. जर आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्ही दोघीही आत्महत्या करू." - समलिंगी जोडपे
पोलिसांची चौकशी सुरू : लक्ष्मीपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी राजवर्धन कुमार यांनी एका मुलीच्या मोबाईलवर कॉल केला आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितलं. यानंतर दोन्ही मुली गुरुवारी रात्री पाटनाहून ट्रेननं जमुईला पोहोचल्या. जमुई जीआरपीनं दोघींना पकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांना लक्ष्मीपूर पोलीस स्टेशन पोलिसांच्या ताब्यात दिलं. चौकशीत दोघींनी लग्न केलं असल्याचं सांगितलं.
"समलैंगिक विवाहाचं प्रकरण समोर आलंय. दोन मुलींनी एकमेकींशी लग्न केलंय. एका मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघींनाही पोलीस ताब्यात घेत आहेत. चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येईल. - राजवर्धन कुमार, पोलीस स्टेशन प्रमुख, लक्ष्मीपूर
सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर मान्यता नाही : समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नुकताच सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देताना म्हटलंय की, समलिंगी विवाहाला स्वतंत्र कायदेशीर मान्यता देण्याचा अधिकार हे संसद आणि विधानसभेचं काम आहे.
हेही वाचा :