चेन्नई - देशासह राज्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूदरातही वाढ होत आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु असताना दुसरीकडे या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत लिक्विड भरून ते इंजेक्शन म्हणून अव्वाच्या सव्वा दराला विकण्याचा लाजिरवाणा प्रकार आंध्र प्रदेशमधील विजयवाडामध्ये उघडकीस आला आहे.
चोडवरापू किशोर (39) हा कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा येथील रहिवासी असून एका खासगी रुग्णालयात काम करतो. नोकरी करीत रेमडेसिवीर रिक्त बाटल्या त्याने गोळा केल्या आणि त्यात सलाईनचे पाणी भरायाचा, असा त्याच्यावर आरोप आहे. रेमडेसिवीरची बाटली व्यवस्थित पॅक करत हे बनावट औषध तयार करून तो फार्मसीमध्ये विकायचा. त्याने एक बॉटल 20,000 रुपये किंमतीला विकली आहे. या बनावट औषधांमुळं रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता.
गुंटूर येथील रहिवासी असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी या बॉटल फार्मसीमधून विकत घेतल्या. संबंधित कुटुंबातील सदस्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. रुग्णालयातील डॉक्टरांना बॉटलमधील रसायन रेमडेसिवीर नसल्याचे समजले,तेव्हा हे सत्य समोर आले. कुटुंबियांनी तातडीने ही घटना टास्क फोर्स पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. सलाईनचे पाणी भरलेल्या आशा सहा बॉटलस पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
WHO कडून कोरोना उपचार पद्धतीतून रेमडेसिवीर इंजेक्शन वगळण्याचा निर्णय -
रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर वगळण्याचा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरइंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी आहे, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन आता कोरोना उपचारातून वगळण्यात आल्याची माहिती WHOने दिली आहे. कोरोना रुग्णावरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात केला जात होता.
हेही वाचा - ग्वाल्हेरमध्ये एका तरुणाला ब्लॅक आणि व्हाईट फंगसची एकाच वेळी लागण