नवी दिल्ली - सागर धनकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलीस आज (सोमवार) पहिले आरोपपत्र सादर करणार आहेत. या आरोपपत्रात कुस्तीपटू सुशील कुमारसह 12 आरोपींची नावे नमूद आहेत. तर याप्रकरणात 50 पेक्षा जास्त साक्षीदार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज पहिले आरोपपत्र दाखल -
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर धनकर हत्या प्रकरणात आज पहिले आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या आरोपपत्रात 50 पेक्षा जास्त साक्षीदार तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज असल्याचे नमूद केलेले आहे. ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या अहवालाची वाट पाहत आहेत.
सुशील कुमारचा जवळचा सहकारी सुरजीत ग्रेवालला अटक -
दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने 22 जुलै रोजी कुस्तीपटू सागर धनकर हत्या प्रकरणातील आरोपी सुरजीत ग्रेवालला अटक केली. आरोपी कुस्तीपटू सुशील कुमारचा जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जाते.
दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने केली अटक -
16 जून रोजी दिल्ली पोलिसांनी सागर धनकर हत्येप्रकरणी ज्युडो प्रशिक्षक सुभाषला अटक केली होती. तर सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय बक्करवाला यांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकाने 23 मे रोजी दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली होती आणि आता ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
काय आहे प्रकरण -
दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ४ मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा कुस्तीपटू सागर धनकर याच्यासोबत वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोघे जखमी देखील झाले. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले होते.
हेही वाचा - बाटग्यांमुळे भाजपाचा अंतकाळ जवळ, शिवसेनेशी पंगा सोडा नाहीतर औषधाला उरणार नाहीत - शिवसेना