दुर्ग (छत्तीसगड) - येथील चारोडा बस्तीमध्ये तीन साधूंना जनतेने बेदम मारहाण केली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही साधू मुल चोरण्यासाठी आले होते. या घटनेची येथील नागरिकांना मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. परंतु, तोपर्यंत साधूंना येथील गावकऱ्यांनी बेदम चोप दिला होता. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून या साधूंना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Sadhus beaten by villagers) अशीच घटना महाराष्ट्रात घडली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश मधल्या चौघा साधूंना मुले चोरणारी टोळी समजून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या लवंगा येथील नागरिकांनी बेदम मारहाण केली होती. कर्नाटकमधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना, चौघा साधूंना ही मारहाण झाली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
व्हिडिओ व्हायरल झाला - भिलाई तीन पोलीस ठाण्याचे प्रभारी मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही घटना बुधवारी (दि. 5 ऑक्टोबर)रोजी सकाळी 11-12 च्या दरम्यान घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणता व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली. याप्रकरणी एसपी अभिषेक पल्लव यांनीही नाराजी व्यक्त करत स्थानिक तपास अधिकाऱ्यांना फटकारले आहे.
सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "तीन साधू चारोडा परिसरात येत होते. त्याचवेळी कोणीतरी या तीन साधूंनी मूल चोरली अशी बातमी पसरवली. यानंतर स्थानिक लोकांनी साधूंना थांबवून चौकशी सुरू केली. त्यापूर्वी साधूला काही समजू शकले नाही. त्यानंतर तेथे आणखी जमाव जमला आणि त्यांनी साधूंना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, साधूंना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारामारीत एका साधूचे डोकेही फुटले आहे. यातील सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सांगली येथेही झाली होती मारहाण - उमदी पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चार साधू हे देवदर्शनाच्या निमित्ताने कर्नाटकच्या विजापूर ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर तेथून ते पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूरकडे जात होते. हे साधू लवंगा गावात पोहोचले. यावेळी या साधूंच्याकडून एका शाळकरी मुलाला रस्त्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या काही ग्रामस्थांना साधूंच्या बद्दल संशय आला. त्यानंतर ग्रामस्थांनी साधूंच्याकडे चौकशी सुरू केली असता. साधू आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला.
ही मुले चोरी करणारी टोळी नसल्याचे स्पष्ट - यावेळी मोठ्या प्रमाणात वादावदी झाल्यानंतर ग्रामस्थांना ही मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला. त्यानंतर ग्रामस्थांनी चौघा साधूंना गाडीतून बाहेर ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या साधूंना बाहेर ओढून ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. सदर घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघा साधूंना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांची सखोल चौकशी सुरू केली. यामध्ये त्यांच्याकडे आधार कार्ड मिळून आले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक माहिती विचारली असता, त्यांच्या नातेवाईकांची मोबाईल क्रमांक त्यांच्याकडून मिळाले. त्यानंतर या चौघा साधूंची उत्तर प्रदेश मधल्या मथुरा या ठिकाणी चौकशी केली असता, ते मथुरा येथीलच खरे साधू असल्याचा समोर आले आहे. हे सर्व श्री पंचनाम जुना आखाडा येथील साधू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही मुले चोरी करणारी टोळी नसल्याचे स्पष्ट झाले.
गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार - मात्र या मारहाणीबाबत उत्तर प्रदेशच्या साधूंनी कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं पोलिसांना सांगितलं आणि तसा जबाब देखील दिला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तक्रार दोन्ही बाजूने देखील दाखल झाली नाही. केवळ गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडल्याचं साधू आणि ग्रामस्थांनी सांगितले. अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दिली.