जयपूर Sachin Pilot : राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन पायलट यांनी मंगळवारी टोंकमधून विधानसभेची उमेदवारी दाखल केली. या दरम्यान त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मोठा खुलासा केला आहे.
पत्नीच्या नावासमोर घटस्फोटीत लिहिलं : सचिन पायलट यांनी प्रतिज्ञापत्रात पत्नी सारा पायलटपासून घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. त्यांनी आपल्या नामांकन पत्रात पत्नीच्या नावासमोर घटस्फोटीत असं लिहिलंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या, परंतु घटस्फोटाची सार्वजनिकरित्या पुष्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र सचिन पायलट यांचा घटस्फोट कधी झाला हे या प्रतिज्ञापत्रात नमूद नाही.
मुलांची आश्रित म्हणून नोंद : सचिन पायलट यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात, अरन पायलट आणि विहान पायलट या दोन मुलांची जबाबदारी आपल्याकडे असल्याचं म्हटलंय. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं प्रतिज्ञापत्रात आश्रित म्हणून नमूद केली. विशेष म्हणजे, या आधी २०१८ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात सचिन पायलट यांनी सारा पायलट यांचा उल्लेख पत्नी असा केला होता. २०१८ च्या निवडणुकीनंतर त्यांची पत्नी आणि मुलं त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी देखील हजर होते.
सचिन पायलट फारुख अब्दुल्लांचे जावई : सचिन पायलट यांनी २००४ मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला यांची बहीण सारा अब्दुल्ला यांच्याशी लग्न केलं. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा मीडिया रिपोर्ट्समध्ये येऊ लागल्या होत्या. मात्र तरीही सचिन पायलट नात्यात खट्टू असल्याच्या चर्चा जाहीरपणे फेटाळताना दिसले होते.
अब्दुल्ला कुटुंबाचा लग्नाला विरोध होता : सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांची भेट, सचिन अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या व्हार्टन स्कूलमध्ये शिकत असताना झाली होती. कालांतरानं हे दोघं प्रेमात पडले. मात्र अब्दुल्ला कुटुंबाचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे बराच काळ त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली नव्हती.
हेही वाचा :