तिरुवनंतपुरम् - सबरीमला मंदिराची यात्रा सुरू झाली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे यावर्षी मंदिराला मिळणाऱ्या देणगीमध्ये कोट्यवधी रुपयांची घट झाली आहे. गेल्यावर्षी २६ डिसेंबरपर्यंत मंदिर समितीला १५६ कोटी ६० लाख रुपयांची देणगी विविध स्वरूपात मिळाली होती. यावर्षी हा आकडा ९ कोटी ९ लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे.
भाविकांच्या संख्येत घट -
त्रावणकोर देवसम बोर्ड(टीडीबी)चे अध्यक्ष एन वासू यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ७१ हजार ७०६ भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे.
न्यायालयाच्या नियमांचे होते पालन -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याला मंदिर समिती प्राधान्य देत आहे. न्यायालयाने सांगितलेली ठरावीक संख्या लक्षात घेऊनच मंदिरात भाविकांना सोडले जाते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मंडला-माकारावैलाकू सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती, एन वासू यांनी दिली. सबरीमला मंदिरात दर्शन सुरू झाल्यापासून २४ डिसेंबरपर्यंत सन्नीधानम, पंपा आणि निलक्कल याठिकाणी कोविडचे ३९० रुग्ण सापडले आहेत. यापैकी ९६ भाविकांना ते पॉझिटिव्ह आढळल्यानंतर माघारी पाठवण्यात आले.
देवस्थान परिसरात कामावर असलेल्या २८९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी, मंदिर समिती कर्मचारी, पोलीस, आरोग्य विभाग आणि देणगी विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.