कोलकाता - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत उद्यापासून १२ डिसेंबर (शनिवार) दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बंगालमध्ये २०२१ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर भागवत यांचा दौरा होत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. राज्यातील सातपेक्षा जास्त कार्यक्रमांत ते सहभागी होणार आहेत. तसेच संघटनेच्या प्रचारकांशी बैठक घेणार आहेत.
भाजप प्रमुख दिलीप घोष यांची भेट घेणार
आरएसएसच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमधील केशबा भवन येथील कार्यालयात १३ डिसेंबरला भागवत अनेक बैठका घेणार आहेत. याशिवाय उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगालमधील संघटनेच्या प्रचारकांशी ते संवाद साधणार आहेत. संघटनेच्या कामाबद्दल त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मोहन भागवत बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख, भाजपचे महासचिव अमिताभ चक्रवर्ती यांच्यासोबतही बैठक घेणार असल्याची माहिती भाजपातील सुत्रांकडून मिळाली आहे.
प्रशासकीय कामासाठी दौरा - जिश्नू बसू
निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मोहन भागवत बंगालच्या दौऱ्यावर येत असल्याची चर्चा सुरू असली तरी, भागवत यांची ही बैठक प्रशासकीय कामासाठी नियमितची असल्याचे दक्षिण बंगालचे आरएसएसचे महासचिव जिश्नू बसू म्हणाले. संघटनेच्या दैनिंदिन कामांसंबंधी त्यांचा हा दौरा असल्याचे बसू यांनी सांगितले.