नवी दिल्ली Telangana Chief Minister : विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी चिंतेची बातमी घेऊन आले आहेत. दोन राज्यांमध्ये पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला. एका राज्यात त्यांचा एकतर्फी पराभव झाला. काँग्रेससाठी एकमेव आशेचा किरण म्हणजे दक्षिणेकडील राज्य तेलंगणा. येथे पक्षानं १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा पराभव केला. आता या राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, यावर पक्षात मंथन चालू आहे.
राहुल गांधी यांची पसंती कोणाला : राज्यात मुख्यमंत्री पदासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहेत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील त्यांच्या नावाला पसंती आहे. "माझी पसंती रेवंत रेड्डी यांना आहे. त्यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं", असं राहुल गांधी यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर हे विधान केलं. या विधानसभा निवडणुकीत पक्षानं रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा पराभव केला. आता कर्नाटकानंतर तेलंगणा दक्षिणेतील दुसरं राज्य बनलं, जिथे काँग्रेसनं विजय मिळवलाय.
डी के शिवकुमार यांची भूमिका : मंगळवारी खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाची बैठक झाली. या बैठकीत तेलंगणातील सरकार स्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित राहुल गांधींनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याशी बोलून त्यांच्याकडून माहिती घेतली. या बैठकीला तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरेही उपस्थित होते. त्यांनी आपला अहवाल पक्षप्रमुखांना सादर केला आहे.
शपथविधी कधी होणार : डीके शिवकुमार हे नवनिर्वाचित तेलंगणाच्या आमदारांशी बोलण्यासाठी आणि मुख्यमंत्री म्हणून सरकारचं नेतृत्व कोणी करावं यावर त्यांचं मत मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या पक्ष निरीक्षकांपैकी एक आहेत. शिवकुमार यांनी त्यांची मतं गोळा करून काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवली. सूत्रांनी सांगितलं की, मंगळवारी संध्याकाळी सीएलपीची औपचारिक बैठक होईल. या बैठकीत रेवंत रेड्डी यांची औपचारिकपणे सरकारचं नेतृत्व करण्यासाठी निवड केली जाईल. मात्र शपथविधीबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
हेही वाचा :