नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले. गेल्या दोन वर्षांपासून मानवजात कोरोनाशी झुंज देत आहे. कधी नव्हे तितकी मदतीची गरज आज जगाला आहे. कोरोनाच्या साथीमध्ये कित्येक लोकांचे प्राण गेले. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था प्रभावित झाली असल्याचे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण त्या महान स्वातंत्र्यसैनिकांचेही स्मरण करूया ज्यांनी स्वराज्याच्या स्वप्नाचा पाठलाग करताना अतुलनीय धैर्य दाखवले आणि त्यासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी झोकून दिले.
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. रेडिओ आणि दूरदर्शनद्वारे प्रसारित केलेल्या आपल्या भाषणात राष्ट्रपती म्हणाले की, आपल्या लोकशाहीतील विविधता आणि जिवंतपणाचे जगभरात कौतुक होत आहे. एकतेची आणि एक राष्ट्र असण्याची ही भावना आहे जो दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या उत्सवावर साथीच्या रोगाचे सावंत असले तरी, ही भावना नेहमीप्रमाणेच मजबूत आहे, असेही ते म्हणाले.
आज आमचे सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी देशभक्तीचा वारसा पुढे नेत आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि देशांतर्गत सुव्यवस्था राखण्यासाठी आमचे सशस्त्र दल आणि पोलीस अहोरात्र जागरुक राहतात जेणेकरून इतर सर्व देशवासीय शांतपणे झोपू शकतील," असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले.