नवी दिल्ली - चीन-भारत सीमा वाद कमी होत असून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटल्यावर लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही देशांदरम्यान चर्चेची 10 फेरी पार पडली असून योग्य परिणाम बैठकीतून निघाल्याचे त्यांनी सांगितले. जे काही निराकरण झाले आहेत. त्यात एक सरकार म्हणून, एक राष्ट्र म्हणून आम्ही राष्ट्रीय हित सर्वोपरी असल्याचे दर्शवलं आहे. चीनशी भारताचे संबंध हे आपल्या इच्छेनुसार असतील. चीनसोबतचे संबंध जसे आपल्याला विकसित करावे वाटतील. तसे ते विकसित होतील, हा संपूर्णपणे सरकारचा विचार आहे, असे नरवणे यांनी सांगितले.
एक शेजारी म्हणून आपल्याला सीमेवर शांतता व स्थिरता हवी आहे. कोणालाही सीमेवर कोणत्याही प्रकारची अस्थिरता नको असते. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या चर्चेतून योग्य परिणाम आले आहेत. दोन्ही देशांसाठी ही विजय-परिस्थिती आहे, असे नरवणे म्हणाले. लडाखमधील युद्धजन्य स्थिती ही चीन आणि पाकिस्तान यांचा भारताविरोधात कट असल्याचे त्यांनी नाकारले. तसेच भारत सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी रणनीती बनवतो आणि त्यात यशस्वीही होतो, असे ते म्हणाले.
चीन-भारत तणाव निवळला -
पँगॉग तलावाच्या उत्तर आणि दक्षिणी भागावर तैनात असलेले सैन्यदल मागे हटले आहे. चीन आणि भारतामध्ये लष्करी कमांडर स्तरावरील झालेल्या चर्चेनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला होता. चर्चेमध्ये 10 फेब्रुवारीपासून सैन्यदल मागे घेण्यास सुरुवात करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी लडाखमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही सैन्यामध्ये तणावाचे वातावरण होते.
राजनाथ सिंह यांच्या माहितीनुसार....
मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगाँग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल २०२० नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाईल. पूर्वीप्रमाणे चीन त्यांचे सैन्य फिंगर ८ (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल तर भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ थांबेल. जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलताना सांगितले होते.