मुंबई : आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today ) उदयनराजें आज रायगडावर येणार आहेत.तर बुद्रुक येथे संबाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार आज आत्मक्लेश करणार आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
- उदयनराजे आज रायगडावर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूवर उदयनराजेंनी शिवसन्मानाचा निर्धार केला. आज ते रायगडावर येणार आहेत. शिरकाई, जगदिश्वर मंदिराला अभिवादन केल्यानंतर उदयनराजे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत. उदयनराजे आज नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थक राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या हस्ते राजापूर येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राजापूर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक आणि 200 महिलांचा पक्षप्रवेश होणार आहे. गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव पाहता राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज ठाकरे यांच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे
- महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी..महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवार करणार आत्मक्लेश: बुद्रुक येथे संबाजी महाराजांच्या समाधीस्थळी रोहित पवार आज आत्मक्लेश करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जाणार आहे.
- सिनेट निवडणुकीत उडणार धुरळा : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर पहिल्या ठाकरे गट सिनेटच्या निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी गतवर्षी 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. यंदादेखील निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंनी तयारी केली आहे. पण या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची शिंदे गट, मनसे आणि भाजपशी टक्कर असणार आहे. जानेवारीत ही निवडणूक जाहीर होईल.
- अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देण्यात आली होती. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दाखल केलेला सी-समरी रिपोर्ट आधी रद्द करा, मगच नव्याने तपास सुरू करा अशी मागणी याप्रकरणातील तक्रारदारांनी कोर्टाकडे केली आहे. तक्रारदार माणिकराव जाधव यांच्यावतीने तसा रितसर अर्जच कोर्टात सादर करण्यात आला असून शालिनीताई पाटील, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीनंही आज कोर्टात तसे अर्ज करण्यात येणार आहेत.