मुंबई : आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा.
- राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत. महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ या सिनेमाच्या मुहूर्तासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
- शरद पवार भारत जोडो यात्रेला उपस्थित राहणार का? आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मागील दोन दिवसांपासून मुंबईतील प्रसिद्ध ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल आहेत. आज त्यांची एक महत्त्वाची टेस्ट होणार असून त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज मिळणार की त्यांची ट्रीटमेंट सुरू राहणार याबाबतीत डॉक्टर निर्णय घेणार आहेत. जर सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या तर आज दुपारी दोन पर्यंत शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो आणि त्यानंतर ते शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी जाणार आहेत.
- कोल्हापुरात लव जिहादवरुन नितेश राणेंचा ठिय्या : लव्ह जिहाद झाल्याच्या संशयावरून भाजपचे आमदार नितेश राणे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. एक अल्पवयीन मुलगी पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे. एका मुस्लिम तरुणाने तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी तपासासाठी 3 पथकं तैनात केली आहेत.
- आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक : राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक आहे. या बैठकीत राज्यातील उद्योगांसंदर्भात चर्चा होईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिकेची घोषणा केलेली आहे. यावरती सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
- अंधेरी पोटनिवडणूक मतदान तयारी : गुरुवारी 3 तारखेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काही लोकांना नोटा देऊन नोटा बटण दाबण्यासाठी दबाव टाकला जातोय, असा आरोप करत ऋतुजा लटकेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या पोटनिवडणुकी संदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 2 वाजता
- आज भारत वि. बांग्लादेशमध्ये लढत : आज टी- 20 वर्ल्डकपमध्ये अँडलेडमध्ये भारत वि. बांग्लादेश सामना होणार आहे. द.आफ्रिकेविरोधात झालेल्या पराभवामुळे भारताने हा सामना जिंकल्यास भारताची उपांत्य फेरीची वाट सोपी होईल. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
- अभिनेता शाहरूख खानचा वाढदिवस : नोव्हेंबर महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेला शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट "दीवाना" होता. 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. 'राजू बन गया जेंटलमन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारखे हलकेफुलके चित्रपटांमधूल शाहरूख घरा-घरात पोहोचला आहे.