नवी दिल्ली - वाहन चालकांना परवाना, आरसी बुक आणि तंदुरूस्ती प्रमाणपत्राचे ३१ डिसेंबरच्या पूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची पार्श्वभूमी आणि टाळेबंदीचा विचार करता केंद्र सरकारने आता यासाठी मुदत पुन्हा वाढवली असून आता ३१ मार्च २०२१ पर्यंत नूतणीकरण करता येणार आहे.
कोरोनाचा प्रसार होत असताना नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना एक निर्देशिका जारी केली आहे. त्यात ३१ मार्च २०२१ पर्यंत नूतणीकरणाचा कालावधी वाढवल्याचे सांगण्यात आले.
५ हजार रुपये दंड
जर वाहन चालकांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत आपला वाहन चालवण्याचा परवाना, आरसी आदी प्रमाणपत्रांचे नूतणीकरण केले नाही तर मार्चनंतर वाहन चालकांना ५ हजार रुपये दंड आकारला जावू शकतो.
वाहन चालवण्याचा परवाना असा करा अद्ययावत
वाहन चालवण्याचा परवाना घरी बसून ऑनलाइन अद्ययावत करता येतो. तसेच आरसीला सुद्धा ऑनलाइन अद्ययावत करता येवू शकते. सरकारी वेबसाइटवर जावून डिएल सेवावर क्लिक करावे. त्यात तुमचा डिल म्हणजेच परवाना नंबर टाका. तसेच इतर काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर जवळच्या वाहन परिवहन केंद्रात (आरटीओ) जावून 'स्लॉट बुक' करून त्याचे पैसे भरावे.