जामनगर (गुजरात) - जामनगर उत्तर विधानसभेच्या उमेदवार रिवाबा (Ravindra Jadeja wife Rivaba) ह्या जामनगरचं नव्हे तर पश्चिम राजकोटच्याही मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रिवाबा ह्या प्रचार रॅलींमध्ये लहान मुलांना घेऊन जातात, असा आरोपही कॉंग्रेसच्या उमेदवार नयनबा (Congress candidate Naynaba) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मोर्चा काढताच हे प्रकरण चांगलेच तापले आहे. नयनाबा यांनी जामनगर येथील प्रभाग क्रमांक १ ते ३ परिसरात रोड शो केला. तसेच रिवाबा यांचे निवडणूक ओळखपत्र देखील राजकोट पश्चिम येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Gujrat Election 2022)
मत देण्याचे आवाहन : नयनबा यांनी प्रश्न विचारला की, तुम्ही स्वत:ला मत देत नसाल तर तुम्ही इतरांना किंवा लोकांना कसे आवाहन करणार? ही जनता तुम्हाला कशी मत देऊ शकते? निवडणूक प्रचार रॅलीत तुम्ही लहान मुलांना घेऊन जात असाल तर निवडणूक आयोग त्यांच्यावर काही कारवाई करेल का? यातील बहुतांश मुले 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुभाष यांनी गुजरात निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचीही निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.
रिवाबा यांचे मत : या प्रकरणी रिवाबा म्हणाल्या की, काँग्रेसने हे सर्व आरोप जाणूनबुजून केले आहेत. काँग्रेस गेल्या 27 वर्षांपासून सत्तेत नाही, म्हणून सत्तेत येण्यासाठी हे सगळं करत आहेत. असे मुद्दे जाणीवपूर्वक उपस्थित केले जात आहेत. मी अनेक महिला सक्षमीकरण अभियान आणि संस्थांशी निगडीत आहे. मी त्यांच्या सर्व उपक्रमांमध्ये चांगला सहभाग घेते. माझ्या मतदारसंघातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी कठोर परिश्रम करते. केवळ महिलांनाच नाही तर तरुणांनाही पुढे करण्याचा माझा प्रयत्न आहे. 250-300 मुलांना मोफत प्रशिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळावी यासाठी मी कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत. जेणेकरून भविष्यात त्यांना सरकारी नोकरी करता येईल.
आडनाव बदलले नाही : या उलट नयनबा यांनी आरोप केला आहे की, रिवाबा आधीच विवाहित आहेत पण त्यांनी अद्याप आपले आडनाव बदललेले नाही. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली असली तरी त्यांनी आपले आडनाव कोणत्याही प्रकारे बदललेले नाही. त्या अजूनही स्वतःला रिवाबा सोलंकी अशाच लिहितात. त्यांचे निवडणूक कार्ड पहा. निवडणुकीत भरलेला फॉर्मही पहा. आता हे पण त्या काय प्रसिद्धीसाठी करत आहेत का?