हरिद्वार (उत्तराखंड) : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची सर्वांनाच आतुरता आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या राम मंदिराचे 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली. आता मंदिराच्या संबंधित ताजी माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या उद्घाटनाची तारीख सांगितली आहे.
मुहूर्ताच्या तारखा पंतप्रधानांना कळवल्या : पुढीलवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी ही माहिती दिली. 21 ते 23 जानेवारी या उद्घाटनाच्या मुहूर्ताच्या तारखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवण्यात आल्या आहेत. त्यांच्या उपलब्धतेनुसार उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल, असे गोविंद देव गिरी म्हणाले.
सर्व धर्माच्या नेत्यांना उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण : बुधवारी हरिद्वार येथे आलेले गोविंद देव गिरी यांनी शंकराचार्य राजराजेश्वर यांची भेट घेतली. यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला देशभरातील ऋषी - मुनी आणि राजकारणी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला इतर धर्म आणि पंथाच्या धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल. हा सोहळा प्राणप्रतिष्ठेच्या तारखेच्या एक आठवडा अगोदर सुरू होणार असून तो पुढचे 15 दिवस चालेल. त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे.
जन्मभूमी मार्ग भाविकांसाठी खुला : अयोध्या नगरीत रामललाच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे. वेळोवेळी मंदिराच्या बांधकामाची चित्रेही समोर येत राहतात. अलीकडेच 30 जुलै रोजी जन्मभूमी मार्गही भाविकांसाठी खुला करण्यात आला. या मार्गाने रामभक्तांना थेट रामललाच्या दर्शनासाठी सहज जाता येईल. हा 500 मीटरचा मार्ग खास भाविकांसाठी बनवला गेला आहे.
मजबूत मंदिराची उभारणी : राम मंदिर मजबूत बनावे यासाठी जमिनीच्या पातळीपासून ५० फूट खाली काँक्रीटचा पाया बनवण्यात आला आहे. यावर रामललाचे मंदिर बनत आहे. कोणत्याही विपरीत हवामानाचा फटका बसू नये, अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम केले जात आहे. मंदिर सरयू नदीपासून काही अंतरावरच असल्याने अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास पूराचा मंदिराला कोणताही धोका होऊ नये यासाठी मंदिराभोवती उंच राखीव भिंत बांधण्यात आली आहे. याशिवाय जमिनीच्या खाली अत्यंत मजबूत असा काँक्रीटचा पाया रचला आहे, ज्यामुळे मोठ्यात मोठा भूकंप देखील मंदिराचे नुकसान करू शकणार नाही.
हेही वाचा :