नवी दिल्ली - केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (शुक्रवार) पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. बंगालमध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सिंह राज्यातील बालुरघाट भागाचा दौरा करणार आहेत. याठिकाणी एका रोड शोचे आयोजन करण्यात आले असून राजनाथ सिंह यात सहभागी होणार आहेत.
एप्रिल-मे महिन्यात होणार निवडणुका -
२९४ विधानसभा जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र, त्याआधीच राजकीय पक्षांनी सभा, रॅली, रोड शो, जनसंपर्क अभियानाद्वारे प्रचाराचा सपाटा लावला आहे.
जे. पी नड्डांचा बंगाल दौरा -
काल(गुरुवार) भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोनार बांगला अभियानाला सुरूवात केली. सुमारे २ कोटी नागरिकांच्या सुचना मागवून जाहीरनामा तयार करण्यात येईल, असे नड्डा म्हणाले. दरम्यान, बंगालमध्ये भाजपाकडून परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, यास प्रशासनाने परवानगी दिली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
बंगाल शेजारील आसाम राज्यातही येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (गुरुवार) आसाम दौऱ्यावर गेले होते. राज्यातील नागोन आणि कारबी आंगलोंग जिल्ह्यात त्यांची जाहीर सभा झाल्या. आसाममध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. समाजसुधारक आणि संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मगावाला गृहमंत्र्यांनी भेट दिली.