तवांग (अरुणाचल प्रदेश) Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (२४ ऑक्टोबर) अरुणाचल प्रदेशच्या तवांग येथील सैन्याच्या छावणीत शस्त्रपूजन केलं. भारत-चीन सीमेवरील तवांग जिल्ह्यातल्या बम-ला पास येथे त्यांनी विजयादशमीनिमित्त जवानांशी संवाद साधला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सैनिकांसोबत सहभाग घेत शस्त्रपूजन केलं.
दोन दिवसीय आसाम, अरुणाचल दौरा : यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी समुद्रसपाटीपासून १५,००० फूट उंचीवर उणे तापमानात पहारा देणाऱ्या सैनिकांचं कौतुक केलं. 'आमचे सैनिक कोणत्या कठीण परिस्थितीत देशाच्या सीमांचं रक्षण करतात हे मला पाहायचं होतं', असं ते म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या आसाम आणि अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर असून, सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे देखील त्यांच्यासोबत आहेत.
जवानांशी संवाद साधला : आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राजनाथ सिंह सोमवारी तेजपूर येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश गाठलं. त्यांनी अरुणाचल प्रदेशातील बम ला येथे १९६२ च्या युद्धातील नायक सुभेदार जोगिंदर सिंग यांच्या स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते तवांगला गेले. तेथे त्यांनी पुष्पहार सोहळ्यात सहभाग घेतला. त्यांनी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या तवांग सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा जवानांशी संवाद साधला आणि शस्त्रपूजाही केली.
सैन्य शक्ती मजबूत करण्यावर भर : यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी, 'देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याशिवाय पर्याय नाही', यावर भर दिला. तसंच संरक्षण उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनातून देशाची सैन्य शक्ती मजबूत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. 'पूर्वी आम्ही आमच्या सैन्याला अपग्रेड करण्यासाठी आयातीवर अवलंबून असायचो. मात्र आज देशात अनेक प्रमुख शस्त्रं आणि प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. २०१४ मध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यात सुमारे १००० कोटी रुपये होती. परंतु आज आपण हजारो कोटी रुपयांची संरक्षण उपकरणं निर्यात करत आहोत', असं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :