नवी दिल्ली - गुजरातमधील राजकोट शहरात कोविड रुग्णालयाला आग लागून सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संवेदना व्यक्त केले आहे. ही दुर्घटना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नसल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
काय म्हणाले राष्ट्रपती -
'राजकोट शहरातील कोरोना रुग्णालयातील आगीची घटना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. या वेदनादायी काळात माझ्या भावना पीडित कुटुंबीयांबरोबर आहेत. जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो', असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहे.
आयसीयू वार्डात लागली आग
गुजरातच्या राजकोटमध्ये गुरुवारी एका कोविड हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. राजकोटमधील शिवानंद हॉस्पिटलमधील आयसीयूत सर्वप्रथम आग लागली होती. कोविड हॉस्पिटल असल्याने आयसीयूमध्ये 11 रूग्ण उपचार घेत होते. ज्यापैकी पाच रुग्णांचा आधी मृत्यू झाला होता. त्यात आणखी एका रुग्णाची भर पडल्याने मृतांचा आकडा सहा झाला.
३३ रुग्ण घेत होते उपचार
शिवानंद हॉस्पिटलमध्ये एकूण 33 रुग्ण होते. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा आग विझविण्यात यश आले आहे. आगीच्या मोठ्या ज्वाळांमुळे अनेक रुग्ण जखमी झाले. त्यांच्यासमवेत उर्वरित रुग्णांनाही अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अद्याप कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगीच्या कारणावर स्पष्टीकरण दिले नाही.