जयपूर- प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरची देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच राजस्थानची अंजू ही सोशल मीडियावरील मित्राला पोहोचण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये सातत्याने तणावाची स्थिती असताना प्रेमप्रकरणे ही चर्चेचा विषय ठरत आहेत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही तिच्या मुलांसह प्रेमासाठी ग्रेट नोएडाला पोहोचली. त्याचवेळी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू ही पाकिस्तानात पोहोचल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील अंजूचा विवाह 2007 मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला आहे. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहते. ती पाकिस्तानात पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक अंजूच्या घरी पोहोचले. पोलिसांनी तिच्या पतीकडे चौकशी केली आहे. अंजूच्या पतीने सांगितले की, ती जयपूरला सहलीसाठी गेली होती. त्यानंतर ती कुठे गेली याची माहिती नाही. पाकिस्तानातील लाहोरमध्ये राहणाऱ्या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होती. ती लवकरच परतेल असा विश्वास अरविंदने व्यक्त केला आहे. त्याला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र ती पाकिस्तानात कशी पोहोचली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
पोलिसांकडून तपास सुरू- अंजूचा पती हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे. 2007 पासून तो पत्नीबरोब भिवडीतील टेरा प्रौढ सोसायटीत राहतो. तो डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी अंजू ही होंडा कंपनीत काम करते. अंजूने हिंदू धर्म त्यागून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यांना दोन मुले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अंजू नावाची महिला लाहोरला खैबर पख्तून परिसरात नसरुल्लाह नावाच्या तरुणाकडे पोहोचल्याचे पत्र मिळाले आहे. यासंदर्भात महिलेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पोलिसाकडून गांभीर्याने तपास सुरू आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने नाव न छापण्याच्या अटीवर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत सध्या काहाही बोलणे योग्य नाही. कारण अद्याप याबाबत दुजोरा आलेला नाही.
अंजू पाकिस्तानात कशी पोहोचली? नसरुल्ला खैबर पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंजू आणि नसरुल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाल्यांतर दोघेही तासनतास सोशल मीडियावर बोलू लागले. यानंतर अंजूने नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानला जायचे ठरविले. कदाचित याच कारणामुळे अंजू सहलीला जाणार असल्याचे पाकिस्तानात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्हिजिट व्हिसावर अंजू पाकिस्तानात: अंजू 21 जुलैला व्हिजिट व्हिसावर पाकिस्तानला पोहोचल्याचे तिच्या पासपोर्टवरील नोंदीवरून माहिती समोर आली आहे. तिच्या व्हिसाची मुदत अद्याप संपलेली नाही. भारतीय महिला पाकिस्तानात पोहचल्याने पाकिस्तानी एजन्सी अलर्ट झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजू पाकिस्तानात का आली, याबाबत चौकशी करण्यात आली आहे. अंजूने नसरुल्लाला भेटण्यासाठी आल्याचे सांगितले आहे. नसरुल्ला हा दीर जिल्ह्यात वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.
सीमा हैदरचीउत्तर प्रदेश एटीसकडून चौकशी: पाकिस्तानी महिला सीमा हैदरची नोएडा येथील सचिनबरोबर पब्जी खेळत असताना मैत्री झाली. त्यानंतर प्रेमासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमधून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला. मात्र, सीमाकडे संशयास्पद चार पासपोर्ट व मोबाईल आढळल्याने एटीएसने सीमाची तब्बल आठ तास चौकशी केली आहे. सीमा हैदरने कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे.
हेही वाचा-