जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक बलात्कार पीडिता आणि तिच्या मुलीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. आपल्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. यानंतर या दोघींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी लेखराजसह त्याच्या तीन साथीदारांना जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लेखराजने यापूर्वी पीडितेच्या घरी जात, तिला बळजबरी दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिला या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नको म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली होती. महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितले, त्यानंतर दोघांनी पोलिसांमध्ये लेखराजविरोधात तक्रार दाखल केली होती.
बलात्कारानंतर लेखराज फरार झाला होता. आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे समजताच लेखराज पुन्हा या महिलेच्या घरी गेला, आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. तिची मुलगी तिला वाचवण्यासाठी आली असता, आरोपीने मुलीवरही पेट्रोल टाकत तिला पेटवून दिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या दोघींना जयपूर रुग्णालयात दाखल केले.
या सर्व घटनेसाठी पीडितेचे कुटुंबीय पोलिसांना जबाबदार ठरवत आहेत. त्यांनी वेळीच कारवाई केली असती, तर हा प्रकार झाला नसता असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : जादू-टोण्यातून सात वर्षीय चिमुकलीची हत्या, शरीरातील अवयव घेतले काढून