अलवर - गोवंश तस्करी रोखण्यासाठी राजस्थान सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता गायी आणि म्हशींना 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गोवंश तस्करी रोखण्यात मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान आतापर्यंत 3 लाख 15 हजारांहून अधिक गायी आणि म्हशींना 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक देऊन टॅग करण्यात आले आहे. यामध्ये संबंधित प्राण्याचे वय, प्रजाती आणि रंग यांचा उल्लोख आहे. तसेच या प्राण्यांना टॅग करण्यापूर्वी त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना एफएमजी लस देखील देण्यात येत आहे. टॅगिंग करताना, मालकांची माहिती आणि त्याच्या तपशीलाचा देखील नोंद ठेवण्यात येत आहे. दरम्यान ज्या प्राण्यांवर कोणाचाही मालकी हक्क नाही, अशा प्राण्यांची नोंद ठेवण्यासाठी त्यांना करण्यात आलेल्या टॅगमध्ये जागेचा उल्लेख करण्यात येत आहे.
गुरांच्या तस्करीला आळा बसेल
प्राण्यांना टॅग केल्यामुळे हरवलेल्या तसेच चोरी झालेल्या किंवा आजारी प्राण्यांचा शोध घेणे सहज शक्य होईल. यातून गोवंश तस्करी आणि गोवंश हत्यासारख्या घटनांना आळा घालता येईल. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. अलवर जिल्हा तसेच राजस्थान व हरयाणामधील सीमावर्ती भागात येणारे जिल्हे हे गोवंश तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहेत, आतापर्यंत 500 हून अधिक गुरांच्या तस्करीच्या घटना या भागात घडल्या आहेत. तसेच 10 हून अधिक मॉब लिंचिंगच्या घटनाही घडल्या आहेत. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी आता सरकारकडून प्राण्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.