नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वादग्रस्त असलेले तिन्ही कृषी कायदे (Farm Law) रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांचे तोंड भरून कौतूक केले असून शेतकऱ्यांच्या संघर्षाला सलाम केला. अहंकारी सरकारचा हा पराभव असल्याचे ते म्हणाले. तसेच लढाई संपली नसून संघर्ष आणखी सुरू ठेवायचा असल्याचे त्यांनी नमूद केलं.
तप, संघर्ष आणि बलिदानच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस आणि उन्हाळाच्या दिवसात गरमीचा त्रास सहन केला. या सर्व संकटाना तोंड देत आणि आत्याचार सहन करत शेतकऱ्यांनी आपला सत्याग्रह सुरुच ठेवला. सरकारविरूद्धच्या या लढ्यात 700 हून अधिक शेतकरी-मजूर बंधू-भगिनींनी दिलेल्या बलिदानाला मी नमन करतो, असे राहुल गांधी पत्रात म्हणाले.
हुकूमशहा राज्यकर्त्याच्या अहंकाराशी लढून त्यांना तुम्ही गांधीवादी पद्धतीने निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. हे एक असत्यावर सत्याच्या विजयाचे अनोखे उदाहरण आहे, असे राहुल म्हणाले. तसेच त्यांनी शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांचे स्मरण केले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाच आहुती देऊन सत्याग्रहाला बळ दिलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच लक्ष दिले असते तर हे घडले नसते, असेही ते म्हणाले.
शेतमजुरांच्या पाठीवरील कर्जाचा बोजा कमी करावा -
शेतकऱ्यांना लिहलेल्या पत्रामध्ये राहुल गांधींनी भविष्यातील रणनितींवर भाष्य केले आहे. कायदे रद्द होणार असले तरीही अद्याप असे काही मुद्दे आहेत. ज्यावर सरकारशी दोन हात करणे आहेत, असे राहुल म्हणाले. शेतकऱ्यांना योग्य एमएसपी मिळावी आणि वादग्रस्त वीज दुरुस्ती विधेयक सरकारने मागे घ्यावं, तसेच शेतात वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूवरील कर कमी करावा आणि इंधनाचे दर कमी करावेत आणि शेतमजुरांच्या पाठीवरील कर्जाचा बोजा कमी करावा, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. सध्याच्या आंदोलनाप्रमाणेच भविष्यातही तुमच्या सर्व लढ्यात मी आणि काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या खांद्याला खांदा लावून आवाज उठवू, असे आश्वासन राहुल यांनी शेतकऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे -
या पत्राद्वारे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींनाही सल्ला दिला आहे. आपल्या आश्वासनाप्रमाणे 2022 पर्यंत पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे. यासाठी लवकरात लवकर भविष्यातील योजनांसाठी एक रोडमॅप तयार करावा, असा सल्ला राहुल यांनी सरकारला दिला आहे. तसेच सत्ता हे सेवा करण्याचे माध्यम असते. लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाही शासन व्यवस्थेत स्थान नाही, असे राहुल म्हणाले.