नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोना परिस्थितीबाबत मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांन महामारीला तोंड देण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
"कोविडच्या सुनामीने आपल्या देशाला पुन्हा एकदा तडाखा दिला आहे, त्यामुळे मला पुन्हा तुम्हाला पत्र लिहावे लागत आहे. या अभूतपूर्व संकटामध्ये भारताच्या नागरिकांना तुम्ही प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपले लोक ज्या हाल-अपेष्टांमधून जात आहेत, त्या थांबवण्यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण सामर्थ्य वापरावे अशी मी तुम्हाला विनंती करतो." असे राहुल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ते पुढे लिहितात, "जागतिकीकरणाने परस्पर जोडल्या गेलेल्या जगात भारताची जबाबदारी समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सहा व्यक्तींमध्ये एक भारतीय आहे. या महामारीच्या लाटांनी हे सिद्ध झाले आहे, की आपली लोकसंख्या, अनुवांशिक विविधता आणि जटिलता यामुळे विषाणूला अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक प्रकारात बदलण्यासाठी सुपिकता पुरवते. कोरोना विषाणूचा दुसरा आणि तिसरा स्ट्रेन ही तर केवळ सुरुवातच असल्याची भीती मला वाटते."
"कोरोना विषाणूचा आपल्या देशात प्रसार होऊ देणे हे केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळे काही महत्वाच्या विषयांवर आपण तातडीने विचार करायला हवा." असेही राहुल म्हणाले.
राहुल गांधींनी आपल्या पत्रात पुढील सूचना केल्या आहेत :
- जीनोम सीक्वेन्सिंगचा वापर करुन देशातील कोरोना विषाणू आणि त्याच्या स्ट्रेन्सचे वैद्यकीय ट्रॅकिंग करा.
- आतापर्यंतचे सर्व स्ट्रेन ओळखले गेले आहेत, त्यामुळे त्यावर आपल्याकडील लसी किती परिणामकारक आहेत याचे मूल्यांकन करा.
- आपल्या संपूर्ण लोकसंख्येचे जलदगतीने लसीकरण करा.
- आपल्याकडील माहिती जगातील इतर देशांना स्पष्टपणे, काहीही न लपवता द्या.