बेंगलुरु : सध्या राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दौरा करत आहेत. सध्या ही यात्रा र्नाटक राज्यात आहे. आजपर्यंत राहुल गांधी हे एकटेच गांधी कुटुंबातील म्हणूत चालत होते. आजा गुरुवार (दि. 6 ऑक्टोबर)रोजी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राहुल यांच्या आई सोनिया गांधी यांनीही या यात्रेत सहभाग नोंदवला आहे. बऱ्याच दिवसांपासून राहुल यांच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी धुमाकुळ घातला आहे. आज मात्र, असा एक फोटो समोर आला आहे जो देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी आपल्या आई सोनिया गांधी यांच्या बुटाची दोरी खाली बसून बांधत असल्याचे दिसत आहे. तसेच, एका व्हिडिओमध्ये आपली तब्येत पाहता आपण जास्त चालू नये, आपण गाडीत बसा अशी विनंतही राहुल सोनिया यांना करताना दिसत आहेत.
कर्नाटकातील मंड्या येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. सोनिया या राहुल यांच्यासोबत या यात्रेक काही काळ चालतानाही दिसून आल्या. यात्रेला २६ दिवस पुर्ण झाले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांत सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात बराच काळ भाग घेतला नाही. कन्याकुमारी ते काश्मीर या पाच महिन्यांच्या भारत जोडो यात्रेच्या २६ व्या दिवशी त्या अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी उद्यापासून म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी यात्रेत सहभागी होणार आहेत अशी माहिती आहे.
सोनियांची प्रकृती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. सोनिया गांधी यांचे कर्नाटकशी गहिरे नाते आहे. जेव्हा-जेव्हा गांधी कुटुंबावर राजकीय संकट आले आहे, तेव्हा दक्षिण भारताने त्यांना सावरले आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही दक्षिण भारतातील जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचे सरकार सत्तेबाहेर गेले तेव्हा 1980 मध्ये त्यांना लोकसभेची सुरक्षित जागा हवी होती, त्यावेळी त्या कर्नाटकातील चिकमंगळूरमधून निवडणूक लढवली. इंदिरा गांधी यांनी आंध्र प्रदेशातील मेडक आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नंतर त्यांनी रायबरेलीची जागा सोडली.