नवी दिल्ली - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय सभा रद्द केल्या असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांनाही राजकीय सभा न घेण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाचे संकट पाहता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सभांमधून जनता आणि देशाला किती धोका आहे, याचा राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.
बंगालमधील निवडणूक सभांमध्ये होणाऱ्या गर्दीवर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही भाजपाच्या निवडणुका सभांना लक्ष्य केले जात असून यावर बंदी घालण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. बंगालमध्ये निवडणूक रॅली आणि रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी दिल्लीतच रहावे आणि मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधून कोरोना विषाणूवर काम केले पाहिजे. मात्र, पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सभांना संबोधित करत आहेत, असे काँग्रेस नेता पी. चिदंबरम म्हणाले.
कोरोना रुग्णांची आकेडवारी -
गेल्या 24 तासांत भारतात 2,61,500 ताज्या रूग्णांची नोंद झाली. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,47,88,109 वर पोहचली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी एकदिवसीय वाढ आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1501 जण मरण पावले आणि आतापर्यंत देशातील मृत्यूची संख्या 1,77,150 वर पोहचली आहे. तर देशात सध्या 18,01316 सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित करा; कपिल सिब्बल यांची मागणी