नवी दिल्ली : केरळच्या वायनाड येथील काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे ट्विटर प्रोफाइल बदलले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये 'डिस 'क्वालिफाईड खासदार' असे लिहिले आहे. मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. यानंतर राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलच्या बायोमध्ये 'अपात्र' खासदार असे लिहिले आहे.
कॉंग्रेसचे राजघाटावर सत्याग्रह आंदोलन : काँग्रेसने राहुल गांधींच्या अपात्रतेचा मुद्दा गांभीर्याने घेत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ रविवारी काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय सत्याग्रह करत आहे. मात्र, राजघाटावर आयोजित केलेल्या या संकल्प सत्याग्रहाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. राजघाटावर आयोजित केलेल्या संकल्प सत्याग्रहात काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व बडे नेते कार्यक्रमाला पोहोचले आहेत.
'लोकशाहीसाठी लढत राहणार' : वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरत कोर्टाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधींना शुक्रवारी लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. यावर काँग्रेसचे म्हणणे आहे की, न्यायाच्या या लढ्यात संपूर्ण पक्ष राहुल गांधींच्या पाठीशी उभा आहे. लाखो काँग्रेसजन आणि देशातील जनता त्यांच्यासोबत आहे. दुसरीकडे, काल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना तुरुंगात जावे लागले तरी ते लोकशाहीसाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वायनाडमधून कोण निवडणूक लढवणार? : पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदी आणि अदानींच्या संबंधावरही भाष्य केले. अदानी समुहाला लाभ मिळवून देण्यासाठी नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अदानीवरील माझ्या संभाव्य भाषणाने पंतप्रधान घाबरले, असे देखील ते म्हणाले. खासदारकी रद्द झाल्यावर आता वायनाडमधून कोण निवडणूक लढवणार याचा खुलासा मात्र त्यांनी अद्याप केला नाही. यावर काँग्रेस अध्यक्षच निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा : Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द; प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान