वायनाड (केरळ) : काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या त्यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान बोलताना त्यांनी मणिपूर मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. 'मी राजकारणात १९ वर्षांपासून आहे. मात्र मी मणिपूरमध्ये जे अनुभवले, ते यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते', असे ते म्हणाले.
पंतप्रधान मणिपूरवर केवळ २ मिनिटे बोलले : 'मणिपूरमध्ये हजारो लोकांना हिंसाचाराचा त्रास सहन करावा लागला. कोणाचे घर जाळण्यात आले, कोणाच्या बहिणीवर बलात्कार झाला, तर कोणाचा भाऊ किंवा आई-वडील मारले गेले. संपूर्ण मणिपूर रॉकेल फेकून पेटवून देण्यात आले आहे. मणिपूरात सर्वत्र रक्त आहे. सगळीकडे खून आहे. मणिपूरमध्ये ही परिस्थिती असताना पंतप्रधान संसदेत २ तास १३ मिनिटे बोलले, मात्र ते मणिपूरवर केवळ २ मिनिटे बोलले. भाषण करतानाही ते हसत होते, विनोद करत होते', अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
तुम्ही हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही : 'पंतप्रधान भारत मातेच्या हत्येबद्दल फक्त दोन मिनिटे बोलले. तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही भारताचा अनादर कसा करू शकता? तुम्ही तिथे का गेला नाही? तुम्ही हिंसाचार थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? कारण तुम्ही राष्ट्रवादी नाही. जो कोणी भारताच्या कल्पनेचा खून करतो तो राष्ट्रवादी असू शकत नाही', अशी जळजळीत टीका राहुल गांधींनी यावेळी केली.
भाजपाने मणिपूरला विभाजित केले : 'भाजपाचा हेतू कुटुंबांना नष्ट करण्याचा आहे. भारत एक कुटुंब आहे, त्यांना (भाजपाला) ते विभाजित करायचे आहे. मणिपूर एक कुटुंब होते, त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते लोकांमधील नाते नष्ट करतात, तर आम्ही नाते बांधतो. आम्ही लोकांना एकत्र आणतो. आम्ही कुटुंबे मजबूत करतो', असे राहुल गांधी म्हणाले. 'भाजपाला वाटते की त्यांनी मणिपूर विभाजित करून नष्ट केले आहे. मात्र आम्ही मणिपूरला पुन्हा एकत्र आणू. आम्ही मणिपूरमध्ये प्रेम परत आणू. मणिपूर जाळण्यासाठी तुम्हाला (भाजपाला) दोन महिने लागले. आम्हाला प्रेम परत आणण्यासाठी पाच वर्षे लागू शकतात, पण आम्ही ते करू', असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा :