चंदीगड/दिल्ली : आपचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राघव चढ्ढा पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याशी संबंधित हा काही पहिलाच वाद नाही. ते या आधीही अनेक वादात सापडले आहेत.
पंजाबमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास विरोध : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार निवडून आल्यानंतर, पक्षाने राज्यातून राघव चढ्ढा यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र याला पंजाबच्या लोकांनी आणि राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. राघव चढ्ढा पंजाबी नसल्याने त्यांना विरोध करण्यात आला होता. आम आदमी पक्षाला राज्यसभेवर पाठवण्यासाठी कोणी पंजाबी नेता सापडला नाही का, अशा प्रतिक्रिया त्यावेळी सोशल मीडियावर उमटल्या होत्या.
बंगल्याच्या वाटपावरून वादात : राघव चढ्ढा यापूर्वी बंगल्याच्या वाटपावरून वादात अडकले आहेत. खासदार राघव चढ्ढा यांना दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये बंगला देण्यात आला होता. नियमांच्या पलीकडे जाऊन त्यांना हा व्हीआयपी बंगला दिला गेला होता. त्यावेळी बंगला वाटपाचा हा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रकरणी वाद वाढल्यानंतर राज्यसभा सचिवालयाने त्यांना बंगला नाकारला. राज्यसभा सचिवालयाच्या या आदेशाविरोधात राघव चढ्ढा यांनी पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती.
राघव चढ्ढा यांना टाईप-७ बंगला दिला होता : सामान्यत: खासदारांना टाईप-५ श्रेणीत सरकारी निवास वाटप केले जाते. परंतु राघव चढ्ढा यांना तात्पुरता टाईप-७ बंगला देण्यात आला होता. टाइप-७ बंगले सामान्यतः माजी केंद्रीय मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांना दिले जातात. ही बाब वादात आल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेला टाईप ७ बंगला त्यांच्याकडून काढून घेण्यात आला होता.
अकाल तख्त साहिबचे जथेदार साखरपुड्याला आले : राघव चढ्ढा यांचा बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रासोबत साखरपुडा झाला तेव्हा श्री अकाल तख्त साहिबचे तत्कालीन जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग या सोहळ्याला आले होते. यामुळे तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या एसजीपीसीविरोधात सुरू असलेल्या कारवाया हे या वादाचे कारण होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्यानी हरप्रीत सिंग यांंना SGPC आणि शिरोमणी अकाली दलाच्या अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. शेवटी त्यांना श्री अकाल तख्त साहिबमधून हटवण्यात आले आणि ग्यानी रघबीर सिंग यांना नवीन जथेदार म्हणून नियुक्त करण्यात आले.
हेही वाचा :