बेंगळुरू (कर्नाटक): काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर ध्रुवनारायण यांचे डीआरएमएस रुग्णालयात निधन झाले. डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या ड्रायव्हरने सांगितले की, आज (11 मार्च) सकाळी त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या, म्हणून त्यांनी त्यांना सकाळी 6.40 वाजता रुग्णालयात नेले, परंतु, उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले.
अकाली निधनामुळे पक्षाचे नुकसान : साधी राहणी आणि स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळखले जाणारे ध्रुवनारायण हे चामराजनगर जिल्ह्यातून दोनदा खासदार आणि आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते म्हैसूरच्या विजयनगरमध्ये राहत होते. यावेळी त्यांनी नंजनगुडू मतदारसंघातून काँग्रेसच्या जागेसाठी अर्ज केला. केपीसीसीचे कार्याध्यक्ष या नात्याने जुन्या म्हैसूर भागात पक्ष संघटनात्मक कार्यात सक्रिय असलेले द्रुवनारायण यांच्या अकाली निधनामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. ध्रुवनारायण यांच्या निधनाबद्दल काँग्रेसच्या अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
ध्रुवनारायण हे तळागाळातील कष्टाळू आणि नम्र नेते : माजी खासदार आर ध्रुवनारायण यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ध्रुवनारायण हे तळागाळातील कष्टाळू आणि नम्र नेते होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
सिद्धरामय्या यांनीही केला शोक व्यक्त : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी ध्रुवनारायण यांच्या राजकीय जीवनाचे स्मरण केले. ते म्हणाले की, ध्रुवनारायण यांनी जीवनात कठोर परिश्रम केले. परिपक्वता आणि बांधिलकीने सर्वोच्च पदावर पोहोचण्याचे सर्व गुण त्यांच्यात होते, ते अचानक आमच्यातून गेले त्याचा खेद आहे. हे केवळ काँग्रेसचेच नव्हे तर कर्नाटकच्या राजकारणाचेही मोठे नुकसान असल्याचेही ते म्हणाले आहेत.
निवडणूक प्रचारावर निश्चितच परिणाम : कर्नाटकात यंदा निवडणुका होणार आहेत. या अर्थाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष असल्याने आर ध्रुवनारायण यांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची मानली जात होती. पक्षाने उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे काँग्रेसच्या निवडणूक प्रचारावर निश्चितच परिणाम होणार आहे.
हेही वाचा : शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला प्रोत्साहनपर 2 लाख रुपये देणार -कुमारस्वामी