चंदीगड : अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस आता नेपाळमध्ये पोहोचले आहेत. अमृतपालच्या शोधासाठी पंजाब पोलिसांना दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर विभागाही मदत करत आहेत. गुप्तचर यंत्रणांद्वारे अमृतपालच्या लोकेशनची माहिती मिळवली जात आहे. या सोबतच अमृतपाल सिंगच्या थायलंड कनेक्शनचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अमृतपालचे थायलंड कनेक्शन : दुबईत राहत असताना अमृतपाल सिंग अनेकवेळा थायलंडला गेला होता. अमृतपालला नेपाळ किंवा पाकिस्तानमार्गे थायलंडला पळून जायचे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस अमृतपालच्या थायलंड कनेक्शनमागे दोन प्रमुख कारणे शोधत आहेत. अमृतपालचा फायनान्सर दलजीत कलसी याचेही थायलंडमध्ये कनेक्शन आहेत. दलजीत कलसी याने गेल्या 13 वर्षांत 18 वेळा थायलंडला भेट दिली होती. दुसरी गोष्ट म्हणजे अमृतपालही अनेकदा थायलंडला गेला आहे. अमृतपालची एक मैत्रीणही थायलंडमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.
दीप सिद्धूच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा होता : पोलीस तपासात अमृतपाल सिंगचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. अमृतपाल सिंग याला स्वतःला 'पंजाब वारिस दे' संघटनेचा उत्तराधिकारी घोषित करून समाजसेवा करायची नव्हती. तर त्याला फक्त पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा होता. अमृतपालला त्याच्या नावाखाली पंजाबमध्ये खलिस्तानची मागणी ठळकपणे मांडायची होती. दीप सिद्धूचा भाऊ वकील मनदीप सिद्धू याने 'वारीस पंजाब' संघटनेची कागदपत्रे अमृतपाल सिंग यांच्याकडे कधीच दिली नाहीत. त्यामुळेच अमृतपाल सिंग याने त्याच्या एका सहकाऱ्यासोबत 'वारीस पंजाब दे' नावाची संघटना स्थापन केली.
'वारीस पंजाब दे' ची स्थापना : अमृतपालच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान उघडकीस आलेल्या काही कागदपत्रांवरून असे सूचित होते की 'वारीस पंजाब दे' ची स्थापना कदाचित पूर्वीची आहे. अमृतपालचा जवळचा सहकारी गुरमीत सिंग बुक्कनवाला याने मोगा जिल्ह्यातील दुन्नेके गावात या संस्थेची नोंदणी केली होती. त्यावेळी तिचा पत्ता 'गुरु नानक फर्निचर स्टोअर' असा देण्यात आला होता.