चंदीगढ - ईदच्या निमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुस्लिमबहुल क्षेत्र असलेल्या मलेरकोटलाला पंजाबचा 23 वा जिल्हा म्हणून घोषित केले आहे. यावरून नवा वाद पेटला आहे. मलेरकोटची निर्मिती ही काँग्रेसच्या फाळणीच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर केली. त्याला अमरिंदर सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
ज्यांच्या राज्यात कायद्याची अंमलबजावणी संपली आहे, कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत मागणाऱयांना तुरूंगात पाठविले जात आहे, अशा लोकांना आमच्या प्रकरणांमध्ये बोलूच नये. जर कोणाला पंजाबचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मी पुस्तक उपलब्ध करुन देईल, असे उत्तर सिंग यांनी योगींना दिले.
योगी आदित्यानाथ यांचे टि्वट -
आदित्यनाथ यांनी ट्विट केले होते की, 'मत आणि धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत भावनेच्या विरोधात आहे. मलेरकोटची निर्मिती ही काँग्रेसच्या फाळणीच्या धोरणाचे प्रतिबिंब आहे.
योगींची टीका हास्यपद -
आदित्यनाथ यांच्या ट्विटवर कडक प्रतिक्रिया व्यक्त करताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी टि्वट केले की, " योगींना पंजाबच्या धर्माविषयी किंवा . मलेरकोटच्या इतिहासाबद्दल काय माहित आहे?" योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपाचा पूर्वीचा इतिहास पाहता त्यांची ही टिप्पणी अयोग्य तसेच हास्यास्पद वाटत आहे, असे टि्वट सिंग यांनी केले आहे.
जातीय द्वेष पसरविण्याचा भाजपाचा इतिहास आहे. गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंत हिंसाचार पसरविण्यात भाजपा सहभागी आहे. 1984 च्या शीख दंगलीच्या वेळीही त्यांचे समर्थक हिंसाचाराला चालना देत होते. पंजाबमधील धार्मिक ग्रंथांच्या नावाखाली तणाव वाढवण्याच्या त्याच्या षडयंत्राबद्दल सर्वांना माहिती आहे, असेही सिंग म्हणाले.
उत्तर प्रदेशात जातीयवादी घटनात अव्वल -
लोकसभेत दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ देत अमरिंदर सिंग यांनी योगींवर हल्ला केला. 2014 च्या तुलनेत 2017 मध्ये देशात जातीयवादी कार्यात 32 टक्के वाढ झाली आहे. देशभरात 822 जातीय घटनांच्या तक्रारी नोंदल्या गेल्या. त्यापैकी 195 घटना एकट्या उत्तर प्रदेशात घडल्या होत्या. या घटनांमध्ये 44 जणांनी आपला जीव गमावला, तर 542 लोक जखमी झाले होते, अशी टीका सिंग यांनी केली.
मी वचन पूर्ण करतोय -
योगी आदित्यनाथ यांना हे माहित नाही, की यूपीच्या अब्दुल हमीद यांनी पंजाब वाचवण्यासाठी 1965 मध्ये आपले प्राण अर्पण केले होते. मलेरकोटलाचे नवाब शेर मोहम्मद खान यांनी सरहिंदच्या राज्यपालाला विरोध केला होता, हेही भाजपा नेत्यांना माहिती नाही. 2002-07च्या कार्यकाळात मी मलेरकोटला वचन दिले होते. मी आता ते पूर्ण करीत आहे, असे कॅप्टन म्हणाले.
हेही वाचा - कोरोना : ग्रामीण अन् अदिवासी भागातील व्यवस्थापनासाठी केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी