नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती होती, परंतु आता देशातील बर्याच राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरणासंदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पंजाबमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला लसीकरण ब्रँड अँम्बेसेडर केले आहे.
आज सोनू सूदने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सोनू सूदला लसीकरणासाठी ब्रँड अँम्बेसेडर केल्याची घोषणा केली. लोकांना कोरोना लस घेण्यास प्रेरित करण्याकरीता सोनू सूद यांच्यासारखा दुसरा आदर्श कोणीही असू शकत नाही. पंजाबमध्ये कोरोना लस घेण्याबद्दल लोकांमध्ये बरीच शंका आणि भीती आहे, असे सिंग म्हणाले.
सोनू सूद यांनी गेल्या वर्षी स्थलांतरितांना मदत केली. जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. लोकांना कोरोना लसीचे महत्त्व समजून सांगण्यासाठी ते योग्य व्यक्ती आहेत. त्यांचा निश्चितपणे लोकांवर प्रभाव होईल, असेही सिंग म्हणाले.
सोनू सूदची प्रतिक्रिया -
अभिनेता सोनू सूदने नवी जबाबदारी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये योगदान देण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले. सोनू सूदने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना "आई एम नो मसीहा" हे पुस्तक भेट म्हणून दिले. हे पुस्तक सोनू सूदच्या मोगा ते मुंबईदरम्यानच्या प्रवासावर आणि त्याच्या अनुभवावर आधारित आहे.
2020 चा टॉप ग्लोबल आशियाई सेलिब्रिटी -
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला 2020 साठी पहिल्या क्रमांकाचा आशियाई सेलिब्रिटी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यूकेस्थित ईस्टर्न आय या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या 50 आशियाई सेलिब्रिटींमध्ये सोनू अव्वल ठरला आहे. लॉकडाउन दरम्यान परोपकारी कार्य केल्याबद्दल सोनूचा गौरव करण्यात आला आहे. त्याने स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यास मोठी मदत केली होती.
लसीकरण गरजेचे -
देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून ही लाट थोपवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय भारतासमोर आहे. देशात कोरोना लसीकरण चालू आहे. बर्याच लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. काही लोकांनी पहिला डोस घेतला आहे. दरम्यान असे बरेच लोक आहेत जे अद्याप लस घेण्यास घाबरत आहेत.
हेही वाचा - छत्तीसगड : एका लाखाचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार