लखनऊ puncture mechanic son Becomes Judge : पंक्चर काढणाऱ्या कामगाराचा मुलगा न्यायाधीश झाल्यानं मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अहद अहमद असं न्यायाधीश बनलेल्या पंक्चर कामगाराच्या मुलाचं नाव आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीसीएस जे ( PCS J ) 2022 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत अहद अहमदनं हे यश मिळवलं आहे. अहद अहमद हा प्रयागराजमधील नवाबगंज परिसरात राहणारा आहे. विशेष म्हणजे अहदच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी कर्ज घेऊन त्याला शिकवलं आहे. मुलगा न्यायाधीश बनल्याचं समजताच त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आहेत.
वडील चालवतात पंक्चरचं दुकान : प्रयागराजमध्ये नवाबगंज परिसरातील बरई हरक या गावात अहद अहमदचे वडील शहजाद हे पंक्चरचं दुकान चालवतात. यासह शहजाद छोटसं किराणा दुकानही चालवतात. तर अहदची आई कपडे शिवण्याचं काम करते. फावल्या वेळेत अहदही त्याच्या आई वडिलांच्या कामात मदत करत होता. त्यानं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कठोर परिश्रम घेऊन तो यशस्वी झाला आहे. मुलाच्या यशानं त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत.
पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश : अहद अहमद यांना बिए केल्यानंतर एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. एलएलबी करुन त्याला वकिली करायची होती. मात्र कोरोना काळात त्याचं वकिली करायचं शक्य झालं नाही. त्यामुळे अहदनं पीसीएस जे या परीक्षेची तयारी करायचं ठरवलं. घरची आर्थिक परिस्थिती कोचिंग लावण्यासारखी नसल्यानं अहदनं घरीच चयारी सुरू केली. त्याचे वडील शहजाद आणि आई अफसाना यांना चार मुलं असून अहदनं पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे. त्याचे इतर भावंडंही अभ्यास करुन सक्षम झाली आहेत.
गावातील नागरिकांनी केलं कौतुक : उत्तरप्रदेश लोकसेवा आयोगानं घेतलेल्या पीसीएस जे परीक्षेत अहद अहमदनं यश मिळवून तो न्यायाधीश झाला. त्यामुळे गावाकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. अहदनं राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून गावाचं नाव रोषण केलं, त्यामुळे गावकरी अभिमान व्यक्त करत आहेत.
आईचं स्वप्न मुलानं केलं पूर्ण : हिंदी चित्रपटात कष्टकरी मजुरांची मुलं मोठी होऊन अधिकारी होतात. त्यांच्या पालकांची स्वप्न पूर्ण करतात, असं पाहिल्याचं अहदची आई अफसाना यांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या मुलाला शिकवून मोठं अधिकारी करण्याचं आम्ही ठरवलं होतं. त्यासाठी कुटूंबाचं उत्पन्न वाढवण्यासाठी कपडे शिवण्याचं काम स्वीकारल्याचं अफसाना यांनी यावेळी सांगितलं. मुलगा अहद हा न्यायाधीश झाला, त्यामुळे जागेपणी पाहिलेलं त्याच्या आईचं स्वप्न साकार झालं. 'आई वडिलांनी प्रामाणिकपणानं मेहनत करुन मला शिकवलं, त्यामुळे आपण प्रामाणिकपणानं काम करुन त्यांचा गौरव करणार आहे' असं अहदनं यावेळी सांगितलं.
हेही वाचा :